Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांच्यावर दुःखाचा डोंगर; आई सावित्री देवी यांचे ९१ व्या वर्षी निधन, सभेत भाषण करत असतानाच आई गेल्याची बातमी आली…
मे २०२२ मध्ये योगी आदित्यनाथ तब्बल पाच वर्षांनंतर आपल्या मूळ गावी पंचूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी आई सावित्री देवी आणि कुटुंबीयांची भेट घेतली होती.

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. राजकारणाच्या धावपळीत आणि संन्यासी जीवनाच्या कठोर शिस्तीतही ज्या आईशी त्यांचे भावनिक नाते कायम राहिले, त्या त्यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या मूळ गावी अखेरचा श्वास घेतला.
या वृत्तामुळे योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्यांच्या चाहत्यांकडून आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमध्ये एका सभेला संबोधित करत असतानाच त्यांना आईच्या निधनाची बातमी मिळाल्याचे वृत्त आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, सावित्री देवी यांचे निधन उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावातील त्यांच्या राहत्या घरी झाले. पौडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिल्याचे वृत्त आहे. पंचूर हे योगी आदित्यनाथ यांचे मूळ गाव असून, याच गावात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्ट वन विभागात कार्यरत होते. एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले होते.
पाच वर्षांनंतर घेतली होती आईची भेट
मे २०२२ मध्ये योगी आदित्यनाथ तब्बल पाच वर्षांनंतर आपल्या मूळ गावी पंचूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी आई सावित्री देवी आणि कुटुंबीयांची भेट घेतली होती. आईचे आशीर्वाद घेतानाचा त्यांचा फोटोही त्यावेळी चर्चेत आला होता. गावात त्यांच्या स्वागताची विशेष तयारी करण्यात आली होती आणि त्यांनी कुटुंबीयांसोबत वेळही घालवला होता.
त्यानंतर जून २०२४ मध्ये सावित्री देवी यांची प्रकृती वयोमानानुसार बिघडल्याने त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली होती. त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि आईसोबत काही वेळ घालवला होता.






