“माझ्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली” ; भुजबळांच्या कट्टर विरोधकाचा खळबळजनक दावा

Suhas Kande on Chhagan Bhujbal । राज्यात महायुतीचा मंत्रमंडळ विस्तार होऊन मंत्री आपापल्या कामाला लागले आहेत . तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाराजीनाट्य काही केल्या संपत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. याचे खापर छगन भुजबळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फोडले. तर आता शिवसेना शिंदे गटाचे नांदगावचे आमदार आणि भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांनी छगन भुजबळांविषयी मोठा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर येथील विजयगड या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील, अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंखे यांच्यासह बडे नेते भेटीसाठी दाखल झाले. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा देखील समावेश होता . या भेटीनंतर सुहास कांदे यांनी भुजबळांविषयी महत्वाची माहिती दिली.
“माझ्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली” Suhas Kande on Chhagan Bhujbal ।
अजित पवारांच्या भेटीनंतर सुहास कांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्याविषयी खळबळजनक दावा केला. यावेळी बोलताना कांदे यांनी,”नाशिक जिल्ह्यात जे झालं, ते अतिशय चांगलं वाटलं. मला एकदम छान वाटलं, असा टोला त्यांनी छगन भुजबळांना लगावला. तर भुजबळांबाबत जे सध्या घडलं, त्याचे पुरावे मी वरिष्ठांना दिले होते. माझ्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असा दावा देखील सुहास कांदे यांनी केला आहे. दरम्यान, आता सुहास कांदे यांच्या या खळबळजनक दाव्यावर छगन भुजबळ नेमकं काय बोलणार हे पाहणे गरजेचे आहे.
समीर भुजबळांचा सुहास कांदे यांच्याकडून पराभव Suhas Kande on Chhagan Bhujbal ।
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. कारण छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांच्याशी झाली. नांदगावमधील प्रचारादरम्यान भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पाहायला मिळाला होता. मतदारांच्या दिवशी सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची देखील झाली होती. मात्र, या निवडणुकीत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला.





