Pune District : इथेनॉलमुळे साखर उताऱ्यात घट; सहकारीच्या तुलनेत खासगी कारखाने २.५० टक्क्यांनी मागे

प्रभात वृत्तसेवा
पुणे : ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादनासाठी वळवल्याने पुणे जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांचा उतारा घटला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ८ सहकारी आणि ५ खासगी असे एकूण १३ कारखाने ऊस गाळप करत आहेत. एकीकडे सहकारी साखर कारखान्यांंचा सरासरी निव्वळ साखर उतारा ९.९४ टक्के असताना खासगी साखर कारखान्यांचा सरासरी निव्वळ साखर उतारा फक्त ७.४९ टक्के आहे.
महाराष्ट्राचा साखर गाळप हंगाम सुरू होऊन ५० हून अधिक दिवस झाले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ५५, लाख १३ हजार २३५ मेट्रीक टन ऊस गाळप केला असून त्यातून ८.६९ टक्क्यांच्या उताऱ्याने ४ लाख ७९ हजार ३६० टन साखर उत्पादित केली आहे. संख्येने कमी असले तरी गाळपात खासगी साखर कारखाने पुढे असून त्यांनी एकूण २७ लाख ९७ हजार ९१३ टन उसाचा गाळप केला आहे. त्यातून २ लाख ९ हजार ५१९ टन साखर उत्पादित झाली आहे. तर सहकारी कारखान्यांनी २७ लाख १५ हजार ३२२ टन ऊसगाळप करत २ लाख, ६९ हजार ८४० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
म्हणजेच कमी ऊस गाळप करून देखील सहकारी कारखाने साखर उत्पादनात पुढे आहेत. साखरेची रिकव्हरी चोरत शेतकऱ्यांना कमी एफआरपी देण्याचा आरोप नेहमीच सहकारी आणि खासगी कारखान्यांवर होत असतो. अशात ही आकडेवारी अजून चिंता वाढवणारी आहे. ही तफावत इथेनॉलमुळे आहे, असे मान्य केले तरी फक्त खाजगी कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाचा कोटा मिळतो आणि सहकारी साखर कारखान्यांना मात्र फक्त साखर उत्पादनावर अवलंबून असतात का? असा प्रश्न उपस्थित होतो.
ही आकडेवारी सुरूवातीची असून यात इथेनॉलला वळवलेल्या ऊसाच्या साखरेचा समावेश नसल्याने खासगी कारखान्यांचा उतारा कमी दिसत आहे, हंगामाच्या अंती उताऱ्यात इतकी मोठी तफावत दिसणार नाही.
– डॉ. संजय कोलते, साखर आयुक्तइथेनॉलकडे वळवलेल्या साखरेमुळे उतारा कमी दिसतो, हे खरी असले तरी अनेक कारखान्यांमध्ये साखरेची रिकव्हरी चोरली जाते. उत्पादित झालेली साखर रेकॉर्डवर दाखवली जात नाही, एक टक्का उतारा चोरला तरी टनामागे १० किलो साखर कमी दिसते. यातून कोटींचा काळा पैसा तयार केला जातो.
– राजू शेट्टी, शेतकरी नेते, स्वाभीमानी शेतकरी संघटना
साखर उतारा –
खासगी कारखाने —————– २०२५-२६ – २०२४-२५
दौंड शुगर प्रा. लि. आलेगांव——- ०७.६३ —– ११.८९
व्यंकटेशकृपा शुगर मिल्स ——– ०६.४३ —- ११.५६
बारामती ॲग्रो लि. शेटफळगढे — ०७.५८ —- ११.२३
पराग ॲग्रो फुड्स ऍण्ड अलाईड—०८.७९ —- ११.८५
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कार.— ०६.३२ —- ११.५५
सहकारी
दि माळेगांव ससाका लि ———- १०.५८ —- ११.९५
नीरा-भीमा ससाका लि. ———- ०७.८४ —- १०.४०
श्री सोमेश्वर ससाका लि.———- ११.०० —- १२.०७
श्री संत तुकाराम ससाका ——— ०९.४५ —- ११.५४
विघ्नहर ससाका शिरोली ——— १०.३५ —- ११.६१
श्री छत्रपती ससाका लि———— १०.३८ —- १०.८
भिमाशंकर ससाका लि———— १०.०९ —- १२.००
श्री साईप्रिया शुगर्स लि. ———- ०८.३९ —- ११.७
(भाडेतत्त्वावर भिमा ससाका)





