Indapur : दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार
Pune District : मुंबईमध्ये शरद पवार यांचेशी सिल्वर ओक येथे हर्षवर्धन पाटील यांची राज्यातील सध्याच्या व आगामी काळातील न भूतो न भविष्यती अशा निर्माण तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुमारे तासभर सविस्तर चर्चा झाली.

इंदापूर : राज्यामध्ये तीव्र दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा देणेसाठी वेळेवरती मदत व तातडीने विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी भेट घेऊन राज्यातील दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 7) दिली.
मुंबईमध्ये शरद पवार यांचेशी सिल्वर ओक येथे हर्षवर्धन पाटील यांची राज्यातील सध्याच्या व आगामी काळातील न भूतो न भविष्यती अशा निर्माण तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुमारे तासभर सविस्तर चर्चा झाली.यावेळी शरद पवार यांचेशी राज्यात दुष्काळाच्या तीव्रतेने नागरिकांना व जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत चालले आहे.जनावरांसाठी चारा टंचाई तीव्र होत चालली आहे. तसेच शेतीच्या पाण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून योग्य नियोजन होताना दिसत नाही. त्याचबरोबर राज्यात वीजेचे भारनियमन वाढायला लागले असून, अनेक भागात सायंकाळी 6 ते रात्री 10 असे भारनियमन चालू झाले आहे, आदी विषयावर चर्चा झाली.
तसेच कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर असून अनेक शेतकरी अद्यापी कर्जमाफी पासून वंचित आहेत. तसेच माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरला परवानगीचे आदेश व शेतमजुरांना काम उपलब्ध करून देण्याचे आदेश निघालेले नाहीत. त्याचप्रमाणे दुष्काळामुळे विद्यार्थ्यांना फी माफी संदर्भात ही कार्यवाही झालेली नाही, अशी चर्चाही यावेळी शरद पवार यांच्याशी झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
जेष्ठ नेते शरद पवार यांना या संदर्भातील प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यामुळे आतापासूनच दूरगामी परिणामकारक असे विविध निर्णय घेऊन, त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास त्याचा दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळू शकेल, असे मतही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.





