साखर शाळांना अपेक्षित प्रतिसाद नाही

ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर

केडगाव- ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर काही कारखान्यांनी सरकारच्या मदतीने कारखाना स्थळावर मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू केल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

दौंड तालुक्‍याची ओळख बागायती तालुका असल्याने या ठिकाणी कारखाना सिझनला आणि सध्या सुरू असणाऱ्या गुऱ्हाळावर मोठ्या प्रमाणात कामगार ऊसतोडणी करण्यासाठी बीड, अहमदनगर, आणि तेथील परिसरातून कुटुंबासह येत असतात. पर्यायाने त्यांच्याबरोबरच लहान मुलेही येतात. त्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडून आपल्या कुटुंबाबरोबर यावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

दुसऱ्या बाजूला मागील काही वर्षांपासून दौंड तालुक्‍यात असंख्य गुऱ्हाळघरे सुरू करण्यात आली. एकट्या केडगाव आणि परिसरात 500 हून अधिक गुऱ्हाळे आहेत शिवाय काही ट्रॅक्‍टर मालकांनी चाळीसगाव, माजलगाव परिसरातून मजूर आणून ऊसतोड टोळ्या सुरू केल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत आहे.

  • सर्व शिक्षा अभियानापासून मुले दूर
    सरकार एका बाजूला सर्व शिक्षा अभियान राबवत असताना चौदा वर्षांखालील मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत असे म्हणत असले तरी मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मात्र दुर्लक्षित होत आहे. अशी मुले दिवसभर आपल्या आई- वडिलांना कामात मदत करतात किंवा उसाच्या फडात फिरताना दिसतात. या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्यास त्यांनाही शिक्षणाची दारे खुली होतील आणि ही मुले शिक्षणापासून दूर राहणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)