Sudhir Dalvi : साई बाबांची भूमिका गाजवणारे सुधीर दळवी घरी परतले; आजारपणात तब्बल 19 लाखांचं बिल, मदतीला धावले चाहते
Sudhir Dalvi : जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर आता ते घरी परतले असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Sudhir Dalvi : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात साकारलेल्या साई बाबांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी घराघरात पोहोचले. अलीकडेच गंभीर आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर आता ते घरी परतले असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गंभीर संसर्गामुळे सुधीर दळवी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सेप्सिसचा त्रास झाल्याने त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला होता. या संसर्गाचा परिणाम त्यांच्या सांध्यांवरही झाला असून हात-पायांच्या हालचालींवर त्याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. जवळपास महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर ते घरी परतले असले तरी त्यांच्या उपचारांचा खर्च मोठा झाला आहे.
उपचारांचे बिल १९ लाखांहून अधिक
सुधीर दळवी यांच्या उपचारांचे रुग्णालयाचे बिल तब्बल १९ लाख रुपयांपेक्षा अधिक झाले होते. उपचारांचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केल्याने कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. एवढा मोठा खर्च उचलणे कुटुंबासाठी कठीण ठरत असल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. यानंतर श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने त्यांच्या उपचारांसाठी ११ लाख रुपयांची मदत केली. डिसेंबर २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही श्री साई बाबा संस्थान ट्रस्टला सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी ही मदत करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
चित्रपटसृष्टीसह साई भक्तांकडून मदतीचा हात
सुधीर दळवी यांच्या आजारपणाची आणि कुटुंबाच्या आर्थिक अडचणींची माहिती समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले. अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन यांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. याशिवाय चित्रपटसृष्टीतील इतर व्यक्तींसह अनेक साई भक्तांनीही त्यांच्या उपचारांसाठी योगदान दिले.
“तो आता घरी आहे, पण अजून पूर्णपणे बरा झालेला नाही”
सुधीर दळवी यांच्या पत्नीने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, ते आता घरी परतले असले तरी अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. चालण्यासाठी त्यांना अद्याप वॉकरची मदत घ्यावी लागत आहे. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींची माहिती समोर आल्यानंतर मिळालेल्या मदतीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चित्रपटसृष्टीतील अनेक जण मदतीसाठी पुढे आले असून कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांचा मदत करणाऱ्यांमध्ये प्रमुख सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
साई भक्तांच्या प्रेमाने भारावले कुटुंब
सुधीर दळवी यांनी साकारलेली साई बाबांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे त्यांच्या आजारपणाची माहिती समोर आल्यानंतर अनेक साई भक्तांनीही मदतीचा हात पुढे केला, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. साई बाबांच्या भूमिकेमुळे सुधीर दळवी यांना विशेष ओळख मिळाली आणि याच नात्याने अनेक साई भक्त त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. आजारपणाच्या कठीण काळात मिळालेले प्रेम, पाठिंबा आणि लोकांची उदारता अत्यंत हृदयस्पर्शी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.





