Pune | नौसैनिकाची अशीही एक देशसेवा! मरणोत्तर अवयवदानाने वाचले पाच जणांचे प्राण

पुणे – देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसैनिकाचे मरणोत्तर अवयवदान करण्यात आल्याने पाच जणांचे प्राण वाचले आहेत. पुण्यातील सदर्न कमांड हाॅस्पीटलमध्ये सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये एका 33 वर्षीय नौसैनिकाला ब्रेन स्टेम फेल्युअर झाल्यानंतर “ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले. या नंतर त्याच्या कुटुंंबीयांनी अवयादानाचा निर्णय घेत पाच जणांचे प्राण वाचवत पुन्हा एकदा आपला सुपूत्र देशाच्या हवाली केला आहे. यात अवयवदानात युवकाचे डोळे दान करण्यात आले.
यकृत लष्कराच्या रुग्णालयातील एका रुग्णास देण्यात आले. दोन्ही मूत्रपिंड ३१ वर्षीय युवक आणि १८ वर्षाच्या तरुणाला देण्यात आले. यासोबतच मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाला या नौसैनिकाचे हृदय देण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना नवीन जीवन मिळाले आहे.
कमांड हॉस्पिटलचे मेजर जनरल बी.नंबियार, यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक समन्वयक, आयसीयू कर्मचारी, मल्टिस्पेशालिटी डॉक्टर आणि परिचारिका यांनी विशेष भूमिका पार पाडत हे अवयवदान पार पाडले. तर लष्कर तसेच राज्य पोलिसांंच्या मदतीने हे अवयव मुंबईपर्यंत ग्रीन कॉरिडॉरमधून वेळेत पोहचविण्यात आले.





