Robotic surgery : दोन तृतीयांश फुफ्फुस निकामी असतानाही यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया
Robotic surgery : दोन दिवसांत तरुणी लागली चालू ; सहाव्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज

पिंपरी – उजव्या फुफ्फुसातील सुमारे दोन तृतीयांश भाग कार्यक्षम नसलेल्या २८ वर्षीय तरुणीवर पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची रोबोटिक फुफ्फुस शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
उजव्या श्वासनलिकेतील न्यूरोएंडोक्राइन गाठ आणि कार्यक्षम नसलेला फुफ्फुसाचा भाग रोबोटिक पद्धतीने काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत तरुणी चालू लागली, तर सहाव्या दिवशी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
रुग्णाच्या श्वासनलिकेत गाठ असल्याने उजव्या फुफ्फुसातील हवेचा प्रवाह अडला होता. त्यामुळे फुफ्फुसाचा जवळपास दोन तृतीयांश भाग कार्यक्षम राहिला नव्हता. त्यातच नुकताच न्यूमोनिया होऊन गेल्याने तिची श्वसनक्षमता कमी झाली होती.
अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने छातीवर मोठा छेद देऊन शस्त्रक्रिया करणे जोखमीचे ठरू शकले असते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीचे सखोल मूल्यमापन करून रोबोटिक शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
या शस्त्रक्रियेतील महत्त्वाचे आव्हान म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या फुफ्फुसाचे श्वसन काही काळ थांबवावे लागणार होते. त्यामुळे केवळ डाव्या फुफ्फुसाच्या मदतीने श्वसन सुरू ठेवून रक्तातील प्राणवायूची पातळी सुरक्षित राखणे आवश्यक होते.
यासाठी भूलतज्ज्ञांच्या पथकाने विशेष नियोजन केले. भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी मेहेत्रे आणि त्यांच्या पथकाने शस्त्रक्रियेदरम्यान श्वसन व प्राणवायूच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले.
पारंपरिक शस्त्रक्रियेत छातीवर सुमारे १० सेंटीमीटरचा छेद द्यावा लागला असता. मात्र, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे चार ८ मिलिमीटरचे आणि एक ३ सेंटीमीटरचे असे एकूण पाच लहान छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शारीरिक आघात आणि शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी होण्यास मदत झाली.
सल्लागार शस्त्रक्रिया कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत चंद्र, डॉ. निखिल परवते आणि हृदय व छातीचे शल्यचिकित्सक डॉ. अजित जेजूरकर यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी तिला सामान्य कक्षात हलविण्यात आले. पाचव्या दिवशी छातीतील स्राव बाहेर काढण्यासाठी लावलेली नळी काढण्यात आली. सहाव्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर बाराव्या दिवशी झालेल्या तपासणीत तिचे टाके काढण्यात आले असून ती दैनंदिन कामांकडे हळूहळू परतत आहे.
”रुग्णाच्या उजव्या फुफ्फुसातील जवळपास दोन तृतीयांश भाग कार्यक्षम नसल्याने ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया होती. गाठ आणि बाधित फुफ्फुसाचा भाग सुरक्षितपणे काढतानाच श्वसनाशी संबंधित गुंतागुंत कमीत कमी ठेवणे हे आमचे उद्दिष्ट होते. रोबोटिक पद्धतीमुळे लहान छेदांमधून शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. त्यामुळे रुग्णाची पुनर्प्राप्ती जलद होण्यास मदत झाली. ” -डॉ. प्रशांत चंद्र, कर्करोगतज्ज्ञ, आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालय, पुणे.





