Diwali: दिवाळीच्या गोडव्याला दरवाढीचा अडसर नाही
मुबलक आवक, पुरेसा साठा; किरकोळ विक्री ६० रुपयांपर्यंत

पिंपरी – दिवाळीच्या फराळासाठी साखरेची खरेदी करताना ग्राहकांना यंदा काहीसा दिलासा मिळत आहे. सणासुदीत मागणी वाढूनही साखरेच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. घाऊक बाजारात साखरेचा भाव प्रतिकिलो ४९ ते ५१ रुपयांदरम्यान स्थिर आहे.
किरकोळ बाजारात मात्र साखर ५९ ते ६० रुपये किलोने विकली जात आहे. पुरेसा साठा आणि नियमित पुरवठ्यामुळे दर नियंत्रणात असल्याचे व्यापारी सांगतात.
दिवाळी जवळ आल्याने शहरातील घराघरांत फराळाची तयारी सुरू झाली आहे. लाडू, चिरोटे, करंजी आणि विविध मिठाई तयार करण्यासाठी साखरेची गरज असते. त्यामुळे या काळात साखरेची मागणी वाढते. मागणी वाढल्याने दरही वाढतील, अशी ग्राहकांना चिंता होती.
मात्र, यंदा बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत असल्याने दरवाढीचा मोठा फटका बसलेला नाही. घाऊक बाजारात साखरेचा भाव ४९ ते ५१ रुपये प्रतिकिलो आहे. प्रतिक्विंटल दर सुमारे ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपये होता. किरकोळ दुकानांमध्ये साखरेची विक्री ५९ ते ६० रुपये किलोने होत आहे.
वाहतूक, हमाली, पॅकिंग आणि विक्रीचा खर्च यामुळे दोन्ही बाजारांतील दरांत फरक पडतो. त्यामुळे ग्राहकांना दुकानानुसार दरात काही प्रमाणात तफावत जाणवू शकते.
सणासुदीच्या काळात मागणी वाढली असली, तरी बाजारात साखरेची उपलब्धता पुरेशी आहे. घाऊक बाजारातील आवक सुमारे १० टक्क्यांनी वाढल्याचा दावा व्यापारी करत आहेत. पुरवठा आणि मागणी यांच्यात समतोल राहिल्याने दरांवर नियंत्रण असल्याचे सांगितले जाते.
यापूर्वी काही काळ साखरेच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खर्चात भर पडली होती. सध्या मात्र दर स्थिर असल्याने फराळासाठी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळत आहे.
किराणा दुकानांत खरेदीची लगबग
पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी परिसरातील किराणा दुकानांत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. फराळाचे साहित्य, तेल, रवा, मैदा आणि साखर अशा वस्तूंची खरेदी केली जात आहे.
इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये चढ-उतार होत असताना साखरेचे भाव स्थिर राहिल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या उर्वरित काळातही पुरवठा सुरळीत राहिल्यास साखरेच्या दरात मोठी वाढ होणार नाही, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.
Gift Hamper Trend : मिठाईच्या बॉक्सऐवजी ‘गिफ्ट हॅम्पर्स’चा ट्रेंड





