Gift Hamper Trend : मिठाईच्या बॉक्सऐवजी ‘गिफ्ट हॅम्पर्स’चा ट्रेंड
Gift Hamper Trend : पिंपरी-चिंचवडमध्ये कॉर्पोरेट गिफ्टिंगला उधाण; नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक पॅक्स

पिंपरी – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नातेवाईक, स्नेही आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंच्या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. मिठाईच्या नेहमीच्या बॉक्सऐवजी यंदा आकर्षक ‘गिफ्ट हॅम्पर्स’ देण्याकडे नागरिकांचा आणि उद्योजकांचा कल वाढला आहे.
सुकामेवा, ब्रँडेड चॉकलेट्स, आयुर्वेदिक अभ्यंगस्नान किट आणि पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तूंनी सजलेल्या या हॅम्पर्समुळे शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीला मोठा वेग आला आहे.
सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंच्या खरेदीने औद्योगिकनगरी गजबजली आहे. पिंपरी कॅम्प, चिंचवड, वाकड, निगडी, भोसरी आणि मोशी परिसरातील मॉल, गिफ्ट शॉपी आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये गिफ्ट पॅक्स खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
भेसळयुक्त मिठाईच्या भीतीमुळे आणि आरोग्याच्या जागरूकतेमुळे नागरिक सुकामेव्याला प्राधान्य देत आहेत. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांच्यासोबत फॅन्सी चॉकलेट्स आणि सजावटीच्या पणत्यांचा समावेश असलेल्या कॉम्बो पॅक्सची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. ५०० रुपयांपासून ते अगदी ५ हजार रुपयांपर्यंत हे हॅम्पर्स उपलब्ध आहेत.
कॉर्पोरेट जगतातून मोठ्या ऑर्डर्स
पिंपरी-चिंचवड आणि भोसरी, हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्या, लहान-मोठे कारखानदार आणि व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर गिफ्ट हॅम्पर्स खरेदी करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि कंपनीचा लोगो असलेले ‘कस्टमाईज्ड’ गिफ्ट बॉक्सेस तयार करून घेतले आहेत.
अभ्यंगस्नान आणि आयुर्वेदिक उत्पादनांना पसंती
दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचे औचित्य साधून यंदा सुगंधी उटणे, आयुर्वेदिक साबण, अभ्यंग तेल आणि अत्तर यांचा समावेश असलेल्या ‘स्नान किट’ला मोठी मागणी आहे. रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तूंना ग्राहक पसंती दर्शवत आहेत.
पर्यावरणपूरक पॅकिंगकडे वाढता ओढा
प्लास्टिकमुक्त उत्सवाचा संदेश देत यंदा अनेक कारागिरांनी बांबूच्या टोपल्या, ज्यूटच्या पिशव्या आणि हस्तकलेचे कागदी बॉक्स पॅकिंगसाठी वापरले आहेत. या पर्यावरणपूरक पॅकिंगला पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सण जवळ आल्याने ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी शहरातील दुकानांमध्ये गिफ्ट हॅम्पर्सच्या बुकिंगला मोठा वेग आला आहे.
Rajgurunagar : पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवा; गावे जलसुरक्षित करा





