Smart City : स्मार्ट सिटीचे प्रशस्त रस्ते, तरी पादचाऱ्यांची कोंडी; वाकडमध्ये पदपथावरच थाटले व्यापार
Smart City : ४५ मीटर रस्त्यांसाठी नागरिकांनी घरे गमावली; तरीही पदपथांवरून चालणे अवघड

रमेश ससार
हिंजवडी – स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वाकड परिसरातील अनेक रस्ते रुंद करण्यात आले. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अनेक नागरिकांनी आपल्या घरांवर बुलडोझर फिरवून महापालिकेला सहकार्य केले. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेले हे प्रशस्त रस्ते आणि त्यालगतचे रुंद पदपथ नेमके कोणासाठी? पादचाऱ्यांसाठी की अतिक्रमणधारकांसाठी? असा संतप्त सवाल शहरवासीय उपस्थित करत आहेत.
पदपथांवर पथारीवाल्यांनी थाटलेली दुकाने,आठवडे बाजार व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण आणि दुचाकींच्या बेकायदा पार्किंगमुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे.
वाकड परिसरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवर सध्या हे चित्र पहायला मिळत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात दिवाळीच्या वस्तू विकणाऱ्या पथारीवाल्यांनी पदपथांवर दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
काही दुकानदारांनी व खाद्य पदार्थांच्या विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोरील पदपथ व्यापले आहेत, तर अनेक ठिकाणी खरेदीसाठी आलेले ग्राहक पदपथावर दुचाकी पार्किंग करत असल्याने पादचाऱ्यांसाठी असलेली जागाच शिल्लक राहत नाही. परिणामी, नागरिकांना वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
रुंदीकरणाचा फायदा नेमका कोणाला ?
वाकडमधील दत्तमंदिर रस्ता ४५ मीटरपर्यंत रुंद करण्यासाठी अनेक नागरिकांनी आपल्या मालमत्तांवर कारवाई स्वीकारत प्रशासनाला सहकार्य केले. वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे, या अपेक्षेने रस्ते रुंदीकरण करण्यात आले.
मात्र, रस्त्यांच्या कडेला असलेले पदपथच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने याकडे पालिका प्रशासन केव्हा गांभीर्याने पाहणार असा सवाल सोसायटीधारक रहिवासी करत आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचा फायदा नेमका कोणाला असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
अधिकारी आणि पथारी धारक आर्थिक हितसंबंध ?
वाकडमधील काळेवाडी फाटा ते मानकर चौक, दत्तमंदिर रस्ता, पिंक सिटी रोड, व अंतर्गत चे सर्व डीपी रस्ते अतिक्रमानांनी व्यापले आहेत. पदपथांवर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
पदपथांवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका व पोलीस विभागाची असताना प्रत्यक्षात प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
पदपथ मोकळे होणार कधी?
वाकडमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंग यांमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास त्रासदायक झाला आहे. पदपथावरून चालायचे म्हटले तर अतिक्रमणांचा अडथळा, तर रस्त्यावरून चालायचे म्हटले तर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा धोका, अशा दुहेरी संकटात पादचारी सापडले आहेत.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता वाकडमधील सर्व प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून पदपथांवरील अतिक्रमणे हटवावीत, बेकायदा पार्किंगवर दंडात्मक कारवाई करावी आणि कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी नियमित देखरेखीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“वाकडमध्ये पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे ही चिंतेची बाब आहे व त्यामुळे अपघात सुद्धा झालेले आहेत. याकरिता अनधिकृत अतिक्रमणे हटवून पदपथ अडथळामुक्त करावेत. याबाबतीत रहिवासी नागरिकांकडून आम्हाला वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत व आम्ही आमच्या स्तरावरून संबंधित अधिकारी व विभागाशी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत.
तसेच पथारी व्यावसायिकांच्या रोजगाराचा विचार करून महापालिकेने नियोजनबद्ध हॉकर्स झोन विकसित करून त्यांना हक्काची अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी. वाकडमधील रस्ते आणि पदपथ हे नागरिकांच्या सोयीसाठी आहेत; त्यामुळे ते सुरक्षित, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने ठोस नियोजन करून नियमित कार्यवाही करावी.” – स्नेहा रणजित कलाटे, नगरसेविका





