पुणे जिल्हा | अभ्यास कोपऱ्याला ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडून मिळते पसंती

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – ग्रामीण मुले स्पर्धेत टिकण्यासाठी नियमित स्व-अध्ययनाची सवय जोपासणे करीता माॅडेल स्कूल उत्रौलीसह भोर तालुक्यातील २४ गावांतील ४२५ विद्यार्थ्यांना रचना संस्थेच्या वतीने घरोघरी अभ्यास कोपरा मोहीम सुरू करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील उत्रौली, वेनवडी,
वडगाव डाळ, येवली, भोलवडे, नसरापूर, दिवळे, शिवरे, सारोळा, कासुर्डी, उंबरे, आळंदे, भोंगवली, कांबरे, धांगवडी, कुसगाव, कामथडी, देगाव, करंदी, कांजळे, वेळू, मोहरी, खोपी, केळवडे या गावातील ४२५ विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभागी होत अभ्यास करण्याची सवय अंगवळणी लावून घेत आहेत.
प्रसारमाध्यमे आणि मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे विद्यार्थी अभ्यास आणि मैदानी खेळापासून दूर जात आहेत. या संकल्पनेमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे वळण्यास मदत होत आहे. या अभ्यास कोपऱ्यात मुलांची अभ्यासाला बसण्याची जागा शांत, स्वच्छ, हवेशीर आणि प्रकाशयुक्त तीन फूट बाय तीन फुटांची निश्चित करावी.या ठिकाणी मुलांचे शैक्षणिक साहित्य,वह्या पुस्तके, शालेय साहित्य ठेवलेले असावे.
बसण्यासाठी स्वच्छ सुती मऊ कापड़ी सतरंजी वापर करावा. जागेवरून सहज दिसेल असे मुलांचे भविष्यातील स्वप्न ठळक मोठ्या अक्षरात लिहिलेले असावे. तिथे मुलाचे पूर्ण नाव, इयत्ता, शाळा, आवडता छंद, रंगीत ठळक अक्षरात लिहावे. स्वतः काढलेले चित्र, लिहिलेला निबंध, कविता, शब्दार्थ, गणितातील सूत्रे, पाढे, आकृत्या, नकाशे, सनावळी आदी अभ्यासासमोरील भिंतीवर व्यवस्थित चिकटवलेले असावे. शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे.
रचना संस्थेच्या संचालिका स्वाती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून तालुक्यातील विद्यार्थी,पालकांना सोबत घेऊन १००० मुलांच्या घरी अभ्यास कोपरा बनविण्याचा संकल्प समन्वयक श्रीपाद कोंडे यांनी केला आहे.
अभ्यासाची गती वाढते….
अभ्यास कोपऱ्यामुळे मुलांचे मन शांत, आनंदी राहते.जास्त अभ्यास होतो. केलेला अभ्यास जास्त काळ लक्षात राहून गती वाढते. सलग तीन महिने विशिष्ट ठरलेल्या जागी बसून अभ्यास करायची सवय जपल्यास मन एकाग्र होण्यास मदत होते आहार, खेळ, व्यायामाची सवय लागते. अभ्यासाची गती व क्षमता विकसित व्हायला मदत होते. पालकांनी प्रोत्साहन द्यावे, कौतुक करावे, अभ्यासावेळी घरात शांतता राहील याची काळजी घ्यावी. मुलांबरोबर संवाद साधावा.





