पुणे जिल्हा | आंबाडे शाळेत भरला पुन्हा माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – आंबाडे (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन १९७७-७८ ते १९८३-८४ या वर्षात इयत्ता १ली ते ७वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५० माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी शालेय दिवस अनुभवण्याचा योग ४० वर्षांनंतर या माजी विद्यार्थ्यांनी घेतला.
शाळेची घंटा, शाळा परिसर स्वच्छता, झाडांना पाणी घालणे, सुरेख रांगोळी काढणे, परिपाठ, पसायदान, प्रतिज्ञा, संविधान उद्देशीका, ओळीत जाणे,रांगेत बसणे हा सर्व अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला.
मुख्य कार्यक्रमात माजी शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सात वर्षाच्या काळात अध्यापन करणारे गुरुजन माजी शिक्षक तसेच पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे, निवृत्त शिक्षक ज्ञानोबा रुपनवर, बाळकृष्ण मंगरुळे, इंदुमती रवळेकर, चंद्रभागा बांदल या गुरुजनांचा सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच शाळेत सध्या कार्यरत असणारे मुख्याध्यापक राजू कारभळ, शिक्षक शरद पवार, उज्ज्वला भारती, मोहिनी गायकवाड, सुरेश खोपडे यांना देखील सन्मानीत करण्यात आले. दिवंगत व आजारी शिक्षकांच्या नातेवाईकांना देखील सन्मानित करण्यात आले. विश्वास रांजणे यांनी प्रास्ताविकात, तत्कालीन गुरुजनांचा छडीचा मार, धाक आणि तेवढेच प्रेम यामुळेच आम्ही सर्व घडलो असल्याचे सांगितले.
ह्या स्नेह मेळाव्याचे नियोजन हे विद्यार्थिनींच्या पुढाकारातूनच करण्यात आले. माजी शिक्षकांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि जुन्या आठवणींना उजाळा आणून दिला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील जुन्या आठवणी सांगितल्या व चालू कारकीर्द या विषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. शिवाजी खोपडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या मेळाव्याच्या निमित्त सर्वांनी या वर्षी पासून इयत्ता ५वी ते ७वी मधील प्रत्येकी ३विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर म्हणून गौरव चिन्ह व रोख रक्कम बक्षीस देण्याचे ठरवले. या मेळाव्यात सर्व ५०माजी विद्यार्थी सहकुटुंब हजर होते. विश्वास रांजणे, प्रशांत पाटणे, सुधाकर खोपडे, दीपक मोरे, शांताराम खोपडे, ताराचंद खोपडे, वनिता तुंगतकर, संगीता खोपडे, मालन खोपडे, स्मिता खोपडे, निर्मला खोपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतीक खोपडे याने सूत्रसंचालन केले.





