पुणे जिल्हा | पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यात रमला बालचमू

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – गोकवडी (ता.भोर) येथील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या.
परिसरातील माती, वनस्पतीच्या बिया, ओगाईचे शेण वापरून व हळदीसारखे नैसर्गिक रंगांचा वापर करून गणेश मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणेश मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला.
यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याचा व आपल्या घरी अशीच गणेश मूर्ती स्थापित करण्याचा विद्यार्थ्यांनी निश्चय केला.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या संकल्पनेतून केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक उषा गोरड,उपक्रमशील शिक्षक खंडोबा घोलप,उपशिक्षिका रत्नमाला थोपटे, माधुरी खपाटे यांच्या सहकार्याने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले.
या उपक्रमात विद्यार्थी,शिक्षकांबरोबर पालकांनी मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे अनुभव घेतला. या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक करण्यात आले.
गेले दोन वर्षे हा उपक्रम राबविला जात असून विद्यार्थी स्वतः बनवलेली गणेश मूर्ती आपल्या घरात गणेश उत्सवात बसवितात. माती तयार करताना वनस्पती बिया मिसळल्या. या गणपतींचे विसर्जन कुंडीत करून त्यात रोपं तयार करून शेताच्या बांधावर रोपं लावली.
विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी कल्पकता, नवनिर्मिती, कलागुणांना वाव देण्याकरीता तसेच गणेश मूर्ती विसर्जनातून होणारे पाण्याचे प्रदूषण रोखावे व मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन हे मूल्य रुजवावे हा उद्देश समोर ठेवून सदर उपक्रमाचे आयोजन केले. उषा गोरड, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा गोकवडी (ता.भोर)
विद्यार्थ्यांमध्ये गणरायाची मूर्ती कशी बनवली जाते याची जिज्ञासा असल्याने आपणही गणेश मुर्ती बनवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण व्हावा.
तसेच गणेशाची असणारी ओढ, गणेश आगमनाची आतुरता यामुळे विद्यार्थी उत्सुकतेने आणि उस्फुर्तपणे उपक्रमात सहभागी झाली. -खंडोबा घोलप, उपक्रमशील शिक्षक





