पुणे जिल्हा | भोर तालुक्यात पाणी टंचाईचा फटका जनावरांना

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रातील असणाऱ्या गावांना पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरे, गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. सध्या नीरा देवघर धरणांमध्ये फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे हिरडस मावळातील गावांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
पंचायत समितीमार्फत बारा गावे व वाड्या वस्ती यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने सुविधा दिली जात असून चार गावे प्रस्तावित आहेत. या बारा गावांमध्ये गाई म्हशी मिळून १८२१ आणि शेळी मेंढी ५४३ संख्या आहे, अशा एकूण २,३६४ एवढ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
करंदी खे.बा. (गाई म्हशी ६३७,शेळी मेंढी १६३) पांगारी,नानावळे, शिंदेवस्ती (गाई म्हशी १००) पऱ्हर बु. (कचरे वस्ती,उब्रांटकर वस्ती) (गाई, म्हशी ५९,शेळी मेंढी १५), अंशिपी,उब्रांडे (गाई म्हशी ३९), शिळींब, राजवडी (गाई म्हशी ६६,शेळी मेंढी २४) मोरवाडी,पाचलिंग (गाई म्हशी १२०,शेळी मेंढी ४५) शिंदेवाडी (गाई म्हशी २५२,शेळी मेंढी १५६)
ससेवाडी (गाई म्हशी ३४०,शेळी मेंढी ३८) वारवंड (गाई म्हशी ५१) वरोडी खुर्द (गाई म्हशी २३०,शेळी मेंढी ४५) वरोडी डायमुख (गाई, म्हशी १८०,शेळी मेंढी ३०)जयतपाड हुंबेवस्ती (गाई म्हशी ४३,शेळी मेंढी २७) एकूण गाई म्हशी १८२१ आणि शेळी मेंढी ५४३ संख्या आहे. तसेच पंचायत समितीकडे शिरगाव, कुडली खुर्द,शिरवली हि.मा.,धानिवली ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले आहेत.
भोर तालुक्यात नीरादेवधर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३७ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाई सुरू झाली आहे. टँकरची मागणी वाढली आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले नीरादेवघर धरण १२ टीएससीचे आहे. यावेळी धरण १०० टक्के भरले होते. मागील वर्षी धरणात ३७ टक्के पाणीसाठा होता. यावेळी फक्त ८ टक्के पाणीसाठा आहे.
नीरा दवघरमधून विसर्ग बंद
पूर्व भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या कामासाठी धरणातील पाणी मागील चार-पाच महिन्यांपासून सोडले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा आहे. सध्या धरणात ८ टक्के पाणीसाठा राहिल्याने धरणातील पाणी सोडणे बंद केले आहे. मात्र, धरणात अत्यंत कमी पाणीसाठा राहिल्याने धरणात असलेल्या पाणीपुरवठा विहिरी कोरड्या पडल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या वारवंड,
कारूंगण, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, कुडली बु, कुडली खु, गुढे, निवंगण, पऱ्हर खु, पऱ्हर बु,कोंढरी, वेनुपुरी या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.धरणातील विहिरी कोरड्या पडल्या असून मोठ्या प्रमाणात असलेल्या उन्हाळ्यामुळे ओढे, नाले, झरे, विहिरी आटल्या आहेत. यामुळे पाणी टंचाई दिवसेंदिवस वाहत आहे.





