Pune : स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी; शालेय परिसरही केला स्वच्छ
Pune : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुण्यातील वारजे माळवाडी येथे विद्यार्थ्यांनी स्वच्छता जागृती फेरी काढली. शालेय परिसराची स्वच्छताही करण्यात आली.

Pune : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पी. एम. शहा फाऊंडेशन आणि यशोदीप माध्यमिक विद्यालय, वारजे माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश असलेले फलक हातात घेऊन परिसरातून फेरी काढली. यावेळी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
फेरीनंतर विद्यार्थ्यांनी झाडू आणि कचरापेटीच्या माध्यमातून शालेय परिसराची स्वच्छता केली. यावेळी यशोदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गौतम पवार यांनी विद्यार्थ्यांनी लहानपणापासून स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे. तसेच स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून ती घर आणि परिसरातही जपली पाहिजे, असे आवाहन केले.
पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी यांनी सांगितले की, फाऊंडेशनकडून गेल्या १५ वर्षांपासून पुणे शहरातील १० शाळांमध्ये आरोग्य, स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृह याबाबत वर्षभर जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छतेचा संदेश शाळेपासून घर आणि समाजापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी सरस्वती मेहता, प्रा. अरुण फडतरे, रूपाली चव्हाण, आदिती शितोळे, रवींद्र कावरे, आकाश जाधव, यशोदीप विद्यालयाचे राहुल शेवाळे, वृषाली निकम तसेच भारती विद्यापीठ समाजसेवा शाखेचे मंगेश खेडकर, आदर्श जोंधळे आणि नेहा रेवाचंदानी यांनी सहकार्य केले.





