Raigad : दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; आळंदीहून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Raigad : रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीहून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते.

Raigad : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्रकिनारी फिरत असताना अचानक आठ जण खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. 42 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असे 44 जण सहलीसाठी आले होते. हे विद्यार्थी आळंदीतील विनर अकॅडमीतील असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडालेल्या आठही जणांना समुद्रातून बाहेर काढून उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान आठही जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनेमुळे आळंदीसह राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा पुढील तपास स्थानिक प्रशासन आणि पोलीसांकडून सुरू आहे. समुद्रात उतरताना पर्यटकांनी पाण्याची खोली आणि समुद्राची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.





