पुणे | विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीची मुभा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार साहित्य खरेदी करण्यास मुभा मिळावी व खरेदीमध्ये पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात थेट डीबीटीची रक्कम जमा होणार आहे.
शासकीय वसत्तिगृहे व शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन व इतर आवश्यक सोयीसुविधा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये देण्यात येतात.
शासनाव्दारे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रीयेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत असून त्यानुषंगाने विविध कल्याणकारी योजनेंतर्गत वस्तू स्वरूपात देण्यात येणाऱ्या लाभाऐवजी त्याकरीता रोख स्वरूपात थेट रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
पादत्राणे, शालेय गणवेश, पी.टी.गणवेश, रेनकोट या साहित्यांसाठी डीबीटीची रक्कम मिळणार आहे. यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. वसतिगृह, निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तूसाठी रोख स्वरूपात थेट रक्कम मिळणार आहे त्या वस्तूचे परिमाण व संख्या या तपशीलाची यादी सबंधित गृहप्रमुख गृहपाल, निवासी शाळेतील मुख्याध्यापक, अधिक्षक यांनी विद्यार्थी, पालकांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्याचे बैंक खाते उघडून त्यास आधार क्रमांक संलग्न करण्यात यावा, अशा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बैंक खात्यामध्येच उपरोक्त निश्चित केल्यानुसार देय रक्कम थेट जमा करण्यात यावी.
सदर जमा करण्यात आलेल्या रोख रकमेतून विद्यार्थ्यांनी विहीत परिमाण व तपशीलाप्रमाणे वस्तूंची खरेदी केल्याबाबतची खातरजमा संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख गृहपाल, निवासी शाळेतील मुख्याध्यापक, अधिक्षक यांच्याामार्फत करण्यात येणार आहे. शाळेत विद्यार्थी उपस्थित झाल्यानंतर पहिला हप्त्यामध्ये एकूण ६० टक्के रक्कम व उर्वरीत ४० टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यात विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.





