Pune District : आधार मेळाव्यात विविध योजनांबाबत मार्गदर्शन

विंझर : राष्ट्रीय सेवा योजना विभाग अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि वेल्हे तहसील, महाराष्ट्र शासन, वेल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ रोजी अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये सरकारच्या विविध योजनांच्या डी.बी.टी.साठी आधार लिंक कसे आवश्यक आहे, हे पटवून देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना अंतर्गत लाभार्थींना अर्थसहाय्य डी.बी.टी. (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) करणे कामी, तसेच सेतू सुविधा केंद्रमार्फत ऍग्रीस्टॅक योजनेद्वारे सातबारा जोडणी करून ‘फार्मर आयडी’ तयार करण्याबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यास परिसरातील जवळपास २५० ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाधिकारी प्रा. सुजितकुमार माने यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रा. मनोजकुमार टापरे यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे राष्ट्रपती पदक विजेते प्राचार्य डॉ. संजीव लाटे यांनी या समाजपयोगी कार्यक्रमाची आवश्यकता आधोरेखित केली.





