हडपसर-रामटेकडी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध; माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

पुणे: पुणे महानगरपालिकेने हडपसरमधील रामटेकडी येथे 75 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केला आहे, जो 100 टन कचरा प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. यामध्ये चिकन-मटण कचऱ्याचे व्यवस्थापन आणि जुन्या फर्निचर तसेच गाद्यांचा कचरा प्रक्रिया यांचा समावेश आहे. हा प्रकल्प 15 वर्षांसाठी खासगी एजन्सीला देण्यासाठी महापालिका सुमारे 66 कोटी रुपये खर्च करणार आहे. स्थायी समितीने याला नुकतीच मंजुरी दिली आहे.
मात्र, या प्रकल्पाला माजी नगरसेवक योगेश ससाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ससाणे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर आणि बंडूतात्या गायकवाड उपस्थित होते. या निवेदनात ससाणे यांनी हा प्रकल्प हडपसरात आणल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागरिकांचा आक्षेप आहे की, जागेचे भूसंपादन किंवा घनकचरा विभागाला वर्गीकरण न करता घाईघाईने प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हडपसर, मुंढवा, उरुळी देवाची, हांडेवाडी रोड आणि हडपसर इंडस्ट्रियल एरिया येथे आधीच अनेक कचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने येथील पाच लाखांहून अधिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. “हडपसरला कचरा नगरी बनवण्याचा महापालिकेचा इरादा आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या बैठकीत हा 75 मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प घाईघाईने मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. या परिसरात आधीच 2200 मेट्रिक टनांहून अधिक क्षमतेचे कचरा प्रकल्प कार्यरत आहेत. आणखी एक प्रकल्प आणल्यास हडपसरची ‘कचरा नगरी’ अशी ओळख निर्माण होईल, अशी भीती आहे. “हा प्रकल्प रद्द करावा, अन्यथा संपूर्ण हडपसरकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.





