Restrictions on Flex : राज्यात जाहिरात फलकावर कडक निर्बंध; ‘या’ ठिकणी फलक लावण्यास मनाई

मुंबई : मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराचाच जाहिरात फलक लावता येणार आहे. आता प्रचंड आकाराचे जाहिरातफलक लावण्यास मनाई करण्यात आली असून मर्यादेपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत.
घाटकोपर येथे १३ मे २०२४ रोजी पावसामुळे प्रचंड आकाराचा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू आणि ८० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य शासनाने माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती.
या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला अहवाल सादर केला होता. भोसले समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास, तसेच समितीचे निष्कर्ष व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आहेत.
इमारतींची गच्ची, आवाराची भिंत यावर जाहिरातफलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सर्व महापालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी एक महिन्यांत कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
जाहिरात फलक कोणाच्याही हद्दीत असला, तरी अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांना असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी आता हद्दीचा वाद न घालता अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाईसाठी समन्वय यंत्रणा नियुक्त करण्यात येणार आहे. समितीने अशा फलकांच्या नियमित तपासणी करण्याबरोबरच, कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याबाबतही सूचना केल्या आहेत. मार्गदर्शक तत्वे म्हणून २१ मुद्यांची शिफारस केली आहे.





