भोर तालुक्यात अवैध दारू विक्रीला आळा; राजगड पोलीस सज्ज

भोर : राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने कापुरहोळ गावच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करून देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे भोर तालुक्यातील दारूबंदी अंमलबजावणीबाबत पोलिसांचे काटेकोर निरीक्षण पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई पप्पु रामा शिंदे (पो.शि. 2602) हे अंकीत किकवी दूरक्षेत्रात गस्तीदरम्यान कापुरहोळ गावातील हॉटेल राजवाडाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली दिसल्याने त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
तेथे दिपक रतन प्रधान (रा. निगडे, ता. भोर, जि. पुणे) हा इसम बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी जवळ गेल्यावर आरोपीने झाडाझुडपांचा आडोसा घेत पळ काढला. त्या ठिकाणाहून ‘संखु संत्रा’ नावाच्या देशी दारूच्या १८० मिलीच्या १० बाटल्या असा अंदाजे ८०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मदने करत आहेत. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक गवळी (सो.) यांनी केले असून, राजगड पोलीस अवैध दारू विक्री रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू विक्री, वाहतूक किंवा उत्पादन हे गंभीर गुन्हे असून त्याविरोधात त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.





