मंत्री राठोड यांच्याविरोधात निवेदन; औषध विक्रेत्यांना मनस्ताप

नेवासा – नेवासा तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे तालुकाध्यक्ष दिलीप ढवण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना रविवारी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील कार्यपद्धतीने त्रस्त व तणावग्रस्त झालेले आहेत.अनावधनाने होणाऱ्या त्रुटीकरीता प्रशासनाद्वारे त्यांचे औषध विक्रीचे परवाने काही काळासाठी निलंबित करणे अथवा कायमस्वरूपी रद्द करणे अश्या प्रकारची कारवाई केली जाते. त्या विरोधात मंत्र्यांकडे अपिल केले तर त्या अपिलावर सुनावणी लावून निर्णय होत नाही.
यामुळे अनेक सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागते. राज्य सरकारने गांभीर्याने न घेतल्यास या विरोधात आंदोलन करेल, प्रसंगी बंद ही पुकारावा लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपाध्यक्ष महेश खंडागळे, खजिनदार किशोर चुत्तर, ज्ञानेश्वर दरंदले, सुदर्शन पठाडे, गणेश लंघे, शरद गोल्हार, किशोर खोसे, संदीप नाईक आदी उपस्थित होते.





