शेतकऱ्यांसाठी जलक्रांती: ‘गाळमुक्त धरण’ पोर्टल सुरू, संजय राठोडांचा जलसंधारणाचा संकल्प!

पुणे : “पाणी टंचाई आणि जलस्त्रोतांच्या मर्यादांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीचा विकास पाण्याशिवाय अशक्य आहे. म्हणूनच पाणी अडवणे, साठवणे आणि तलावांचे पुनरुज्जीवन करणे ही आजची गरज आहे. यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना राज्यातील प्रत्येक गावात कायमस्वरूपी आणि प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे,” असे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
‘गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन-
या योजनांच्या अंमलबजावणीसाठी www.shiwaar.com या ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन संजय राठोड यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) संस्थापक शांतिलाल मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, एमडी कोमल जैन, राज्यातील जिल्हाधिकारी, जलसंधारण अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
राठोड म्हणाले, “स्वयंसेवी संस्था शासनासोबत खांद्याला खांदा लावून जलसंधारणाची कामे करत आहेत. बीजेएसच्या शांतिलाल मुथ्था यांच्या नेतृत्वात हे पोर्टल तयार करून विभागाला सुपूर्द करण्यात आले. योजनेची माहिती, पात्रता, निकष आणि प्रशिक्षण एका क्लिकवर उपलब्ध आहे. ”
“सर्वांनी पुढाकार घ्यावा”-
“राज्यातील सरपंच, शेतकरी आणि गावकऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या गावात या योजना राबवण्यासाठी पुढे यावे. जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. निधीची कमतरता भासणार नाही, तो थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला जाईल,” असे राठोड यांनी आश्वासित केले.
गणेश पाटील यांनी योजनेचे महत्त्व विशद केले, तर शांतिलाल मुथ्था यांनी पोर्टलची उपयुक्तता प्रात्यक्षिकासह सांगितली. नंदकिशोर साखला यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेतकऱ्यांसाठी ही योजना जलसंधारणाच्या क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरणार असल्याचे संकेत या उद्घाटनाने दिले आहेत.




