नवरात्रीमध्येच राज्य मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीसांमध्ये तब्बल अडीच तास खलबत

मुंबई – सर्वोच्च न्यायालयात एकीकडे आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी सुरु आहे. यातच विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाच राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात तब्बल अडीत तास बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यानच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक सुमारे अडीच तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार आगामी 16 किंवा 17 ऑक्टोबरला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी अपेक्षा असलेले आमदार सध्या नाराज आहेत. त्या वेळी अचानकपणे राष्ट्रवादीच्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तसेच भाजपचे अनेक आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळाच्या विस्तारात करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.
केंद्राचा विस्तारही लवकरच
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटालाही आणखी एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. केवळ राज्याच्याच नाही तर केंद्राच्या मंत्रिमंडळातही अजित पवार गट तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच राज्याप्रमाणे केंद्रातही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.





