सातारा -छत्रपती शिवाजी संग्रहालय अद्ययावत सुविधांसह थ्रीडी स्वरूपात तातडीने खुले करावे अन्यथा या विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसेल तिथे काळे फासले जाईल, असा इशारा सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. छत्रपती शिवाजी संग्रहालयासंदर्भातील भूमिका सुहास राजेशिर्के यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मांडली. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा शाहू नगरीला आहे. छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ऐतिहासिक शस्त्रे आज्ञापत्रे वस्तू दस्तूर खुद्द छत्रपती शिवराय ज्या सिंहासनावर बसत होते तेथील राजवस्त्र, तलवारी, ढाली, ऐतिहासिक हत्यारे हा छत्रपती शिवाजी संग्रहालयाचा अनमोल ठेवा आहे. छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. दोन वर्षांपूर्वी करोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही इमारत ताब्यात घेतली होती. या सोयीमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने ही इमारत पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केली आहे. तरीसुद्धा इमारतीच्या काही भागांमध्ये करोना हॉस्पिटलसाठी उभारण्यात आलेली शौचालयाची भांडी व रचना हटवण्यात आलेली नाही. येथील जैव वैद्यकीय कचरा हटवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे येसूबाई फाऊंडेशनच्यावतीने आम्ही स्वतः व शिवाजी संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या कामात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांचे सहकार्य मिळाले. येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची 392 वी जयंती आहे. या जयंती दिनी हे शिवाजी संग्रहालय सातारकरांसाठी खुले केल्यास यापेक्षा वेगळा दुग्ध शर्करा योग नाही. संग्रहालयाच्या इमारतीच्या भिंतीचे पोपडे निघत असून काही ठिकाणी स्लॅबला तडे गेले आहेत. संग्रहालयाचे साहित्य अस्ताव्यस्त पडून आहेत याकडेही गांभीर्याने पहा. अद्ययावत सुविधांसह प्रशस्त दालनांमध्ये शिवाजी संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तू व अनमोल ठेव्याची मांडणी करून हे संग्रहालय 19 फेब्रुवारी पूर्वी तातडीने खुले करावे, अशी आमची मागणी आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना दिसेल तिथे तत्काळ काळे फासले जाईल. याच्या परिणामांची जबाबदारी संपूर्णतः जिल्हा प्रशासनावर राहील, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे.