Satara: जिल्हा बँकेसाठी महायुतीत ‘ठरावां’चा फॉर्म्युला, शिवेंद्रसिंहराजेंचे सूचक वक्तव्य; जागावाटपाच्या चर्चेला घटस्थापनेच्या मुहूर्त
Satara विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील 11 जागा वगळता उर्वरित दहा जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रविवारी होणार्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Satara: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रंग दिवसेंदिवस गडद होत असून, महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेला मुहूर्त मिळाला आहे. घटस्थापनेच्या दिवशी रविवारी (दि. 11) महायुतीतील घटक पक्ष जागावाटपावर पुन्हा एकदा निर्णायक चर्चा करणार आहेत. ज्याचे जितके ठराव, त्या प्रमाणात जागा, असा प्राथमिक फॉर्म्युला असला, तरी कोण किती जागांवर दावा करणार, यावरुन राजकीय रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. जागावाटपाचा निर्णय समन्वयाने घेतला जाणार असल्याचे सूचक वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील 11 जागा वगळता उर्वरित दहा जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रविवारी होणार्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणूक रणांगणात 162 उमेदवारांचे 224 अर्ज दाखल आहेत. गृहनिर्माण मतदारसंघातून ज्ञानेश्वर पवार यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघातील उदयनराजे भोसले यांची निवड निश्चित मानली जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 2025 संदर्भातील 20 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीमुळे विद्यमान संचालकांसह इच्छुकांनी एकाच मतदारसंघातून पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. महायुतीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील वाटचाल केली जाईल. बँकेची परंपरा आणि आर्थिक क्षमता कायम ठेवून ती अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
जयकुमार गोरे यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, ‘‘भाजपमध्ये कोणाच्या हातात सूत्रे आहेत, असा प्रश्नच नाही. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम आणि आम्ही सर्वजण एकत्र बसून चर्चा करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नेतृत्व कोण करणार, यावर सुरू असलेल्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सातारा शहरातील विविध विकासकामांचे प्रात्यक्षिक व सादरीकरणही शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर करण्यात आले. गोडोली येथील उड्डाणपूल, प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपराक्रमाचे स्मारक यांसह विविध प्रस्तावांवर चर्चा झाली. आचारसंहिता संपल्यानंतर या कामांना गती देण्याचे संकेत त्यांनी दिले.
‘ठरावां’नुसार जागा ठरणार; पण दावेदार कोण?
ज्याचे जितके ठराव, त्या प्रमाणात जागा, असा महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला असला, तरी प्रत्यक्ष जागावाटपात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. घटस्थापनेच्या दिवशीच्या बैठकीत फक्त जागावाटप होणार नसून, जिल्हा बँकेतील राजकीय वर्चस्वाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.





