Satara: टँकरच्या फेर्यांनी दुष्काळाची धग कमी होईना!
Satara जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना माण तालुका सर्वाधिक होरपळत आहे. 31 गावे आणि 200 वाड्यांमधील 45 हजार 702 नागरिक तसेच 38 हजार 972 पशुधन पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे.

Satara: सातारा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली असून माण, खटाव आणि फलटण तालुक्यांतील हजारो नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला टँकरच्या फेर्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. तीन तालुक्यांतील 39 गावे आणि 236 वाड्यांमधील तब्बल 54 हजार 257 नागरिकांसह 41 हजार 107 पशुधनाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने 35 टँकर तैनात केले आहेत. त्याचबरोबर पाण्याचे स्रोत टिकविण्यासाठी 16 विहिरी आणि 9 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना माण तालुका सर्वाधिक होरपळत आहे. 31 गावे आणि 200 वाड्यांमधील 45 हजार 702 नागरिक तसेच 38 हजार 972 पशुधन पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. या भागासाठी 30 टँकर धावत असून त्यात एका शासकीय आणि 29 खासगी टँकरचा समावेश आहे. दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे-मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दहा विहिरी आणि सहा बोअरवेलही प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत.
खटाव तालुक्यातही परिस्थिती चिंताजनक आहे. सात गावे आणि 36 वाड्यांतील 7 हजार 833 नागरिकांना चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मायणी, कातर खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सहा विहिरी आणि तीन बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील 722 नागरिकांसाठी एक खासगी टँकर सुरू करण्यात आला आहे. मात्र, टँकरची संख्या वाढत असताना मूळ पाणीप्रश्न कायम असल्याने प्रशासनासमोर दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजनांचे आव्हान कायम आहे.
टँकरचा आकडा सांगतो दुष्काळाची तीव्रता!
39 – टंचाईग्रस्त गावे
236 – बाधित वाड्या
54,257 – टँकरच्या पाण्यावर अवलंबून नागरिक
41,107 – बाधित पशुधन
35 – सध्या सुरू असलेले टँकर





