Manoj Jarange : आझाद मैदानाच्या परवानगीवरून पेच कायम! आता मनोज जरांगे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मनोज जरांगे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे दोनदा परवानगी नाकाऱ्यात आल्यांतर आता तिसऱ्यांदा परवानगी मागण्यात आली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आता मनोज जरांगे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.
परवानगी न मिळाल्यास मनोज जरांगे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी ते न्यायालयात दाद मागू शकतात. त्यामुळे आता जरांगे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांनी १५ तारखेला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच केली. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक आणि सहकारी आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही तयारी सुरू केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत आंदोलनादरम्यान आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त, अतिरिक्त मनुष्यबळ तसेच इतर आवश्यक साहित्याचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, जरांगे यांच्या मुंबईकडे सुरू असलेल्या प्रवासात बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पहिला मुक्काम झाला. रात्री उशिरा दोन वाजता ते बीडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो मराठा बांधवांची गर्दी झाली होती. आज ते पुढील मुक्कामासाठी श्रीगोंद्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. सकाळी पोलिसांच्या डॉग स्क्वॉडने जरांगे यांच्या वाहनाची तपासणीही केली.
बीडमध्ये जरांगेंचा सरकारला इशारा
बीडमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला. “सरकारला वाटतं मी त्यांच्यासमोर शरण यावं. पण मी माझी मागणी सोडून देणार नाही. सरकारपेक्षा माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. माझा समाज कोणतेही सरकार पाडू शकतो आणि दुसरे सरकार आणू शकतो.” असं ते म्हणाले आहेत. “मी मरेन, पण माझ्या समाजाची मान खाली घालू देणार नाही.” असा निर्धारही मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.
अंतरवालीतून निघताना भावूक वातावरण
मनोज जरांगे यांनी १५ तारखेला सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी संपूर्ण परिसरात भावूक वातावरण पाहायला मिळाले. मुंबईकडे रवाना होताना जरांगे यांनाही अश्रू अनावर झाले. जरांगे यांची पत्नी, मुलगा आणि मुलगीही यावेळी भावूक झाले. कुटुंबीयांचा निरोप घेत मुंबईच्या दिशेने निघताना त्यांच्या भावनिक क्षणाचे चित्र पाहायला मिळाले.





