Sanjay Raut : एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय : संजय राऊत बरसले! सगळचं काढलं…
Sanjay Raut : या आंदोलनासह राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.

Sanjay Raut : मराठा समाजाची अंतरवाली सराटी येथे आज महत्त्वाची बैठक पार पडणार असून, या बैठकीत मुंबईत जाऊन आंदोलन करण्याबाबतची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारसमोरील अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करण्यात सरकारला यश आलं असलं, तरी आरक्षणाच्या प्रश्नावर अद्याप अंतिम तोडगा न निघाल्याने जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईत धडकणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
या आंदोलनासह राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना वाऱ्यावर सोडलं आहे. या दोन्ही प्रश्नांकडे पाहायला सरकारला वेळ नाहीये. कारण एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी आहे. तर दुसरं सरकार लंडनच्या रस्त्यावर वडापाव खात फिरत आहे, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र डागले.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “मराठवाड्यात कोरडा दुष्काळ आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. सोयाबीन आणि इतर पिकं जळून गेली आहेत. ६० दिवसांपेक्षा अधिक काळ झाला, पाण्याचा थेंब पडलेला नाही. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. लोकांच्या मनात खदखद आहे. दोन्ही प्रश्नांवर सरकार काहीच करत नाही.”
यावेळी संजय राऊत यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही सरकारला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कर्जमाफी आणि सध्याच्या सरकारने केलेली कर्जमाफी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मुंबईत एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्याच्या पार्श्वभूमीवरही संजय राऊत यांनी टीका केली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं.
“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत आहेत. मुंबईत गणेशोत्सव आहे. या काळात मुंबईत गर्दी असते. गृहमंत्र्यांना हे कळायला पाहिजे. मुंबईत आल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडेल, हे जर त्यांना कळत नसेल, साधं सामान्य ज्ञान नसेल तर कठीण आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावरून निशाणा साधला.
Kudal station: गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांची कोकणाकडे धाव; कुडाळ स्थानकावर गर्दीच गर्दी!






