Manoj Jarange : “सरकारची परवानगी असो वा नसो, मुंबईकडे कूच करणारच” – मनोज जरांगे
तसेच ज्या मराठा बांधवांना अंतरवाली सराटीला येणे शक्य आहे, त्यांनी शनिवारी होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Manoj Jarange – सरकारने आमचा अधिकार हिरावून घेऊ नये. कायद्याला धरुन आम्ही उपोषण करण्यासाठी अर्ज केला आहे. न्यायदेवतेचे नियम सरकारने देखील पाळले पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन करणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिली किंवा नाही, तरीही आपल्या मागण्यांसाठी मुंबईकडे कूच करणारच असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केले.
गेल्या 14 दिवसांपासून अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असली तरी मनोज जरांगे यांनी उद्या म्हणजे 12 सप्टेंबर रोजी दुपारी मुंबईला जाण्याचा निर्णय आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव आणि अन्यायाविरुद्ध लोकसमूह एकत्र यावा, त्या लोकसमुहाचे एकत्रित संघटन यावे यासाठी गणेशोत्सव सुरू केला. अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन चिड आली पाहिजे, म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा मराठ्यांकडून किंवा मुंबईत येणाऱ्या एकाही आंदोलनाकडून कसल्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही.
हिंदूंच्या सणावारात म्हणजे आमच्या सणावारात कसलंच विघ्न असणार नाही. फक्त विघ्न हे तुम्ही होऊ नये. विघ्नाच्या भूमिकेत तुम्ही उतर नये. तुम्ही जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हिंदूंना मानणारे असाल तर सरकारने विघ्न बनू नये, हीच आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने परवानगी दिली किंवा नाही, तरीही आम्ही मुंबईला जाणारच. जोपर्यंत आपण सरकारवर दबाव आणत नाही, तोपर्यंत सरकार काहीच बोलणार नाही. तसेच ज्या मराठा बांधवांना अंतरवाली सराटीला येणे शक्य आहे, त्यांनी शनिवारी होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच मुंबईकडे कूच करताना सरकार किंवा पोलिसांनी आंदोलकांना त्रास दिला, तर मराठा बांधवांनी रस्ते रोखून धरावेत आणि आपापल्या गावांमध्ये निदर्शने करावीत. मुंबईकडे होणारा हा मोर्चा यावेळी खूप मोठा असेल, असेही ते म्हणाले.






