ST bus Robbery: एसटी बस अडवून लूटमार! पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील थरारक घटना; चौघे २४ तासांत जेरबंद
ST bus Robbery: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाट्याजवळ घडला थरारक प्रकार; एसटी बस अडवून वाहकाकडील तिकीट विक्रीची रक्कम लुटली.

ST bus Robbery – पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसला स्कॉर्पिओ आडवी लावून चालक व वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहकाच्या खिशातील तिकिटाच्या विक्रीचे ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने लुटणाऱ्या चौघांना शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींनी एसटी बसच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले असून, गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
ही घटना दि. ४ रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास शिरूर हद्दीतील कानिफनाथ मंदिराजवळ, न्हावरे फाट्याच्या परिसरात घडली. एसटी बस क्रमांक एमएच १४ एनपी ०८३८ पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून जात असताना नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या चौघांनी बस अडविली. गाडी घासल्याचे कारण सांगत आरोपींनी बसचालक व वाहकाला शिवीगाळ आणि दमदाटी केली.
त्यानंतर दोघांना मारहाण करून वाहक सतीश आण्णासाहेब बाचकर यांच्या खिशातील तिकिटाच्या विक्रीतून जमा झालेले ८,९६० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी रस्त्यावरील दगड उचलून बसच्या समोरील काचेवर मारला. काच फोडल्यानंतर बसची चावी घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी संदीप गणपत थोरवे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डी.बी. पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शिरूरसह अहिल्यानगर, आळंदी, भोसरी व निगडी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासात अजयकुमार चव्हाण (२४), पवन घोलप (२५), आकाश काळे (२१) आणि सचिन घोलप (२२) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आळंदी, भोसरी व निगडी परिसरातून चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने आरोपींना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली एमएच १४ एमडब्ल्यू ५२३४ क्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार सोर, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, निखील रावडे, सचिन भोई, अजय पाटील व दादाराव नागरे यांच्या पथकाने केली.






