Nhavare: काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस ; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या
Nhavare:पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहकाकडील तिकिटाच्या जमा रकमेतील ८ हजार ९६० रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे.

न्हावरे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहकाकडील तिकिटाच्या जमा रकमेतील ८ हजार ९६० रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे.
आरोपींनी एसटी बसची समोरील काच दगडाने फोडून बसची चावीही घेऊन पलायन केले. या गंभीर प्रकरणाचा तपास करत शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत चौघांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओही जप्त केली आहे.
ही घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे १.४५ वाजता शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्हावरे फाटा याठिकाणी कानिफनाथ मंदिर परिसरात घडली. एसटी बस क्रमांक एमएच १४ एनपी ०८३८ घेऊन चालक संदिप गणपत थोरवे आणि वाहक सतिष आण्णासाहेब बाचकर प्रवास करत असताना नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने बसचा रस्ता अडवला.
स्कॉर्पिओने बसला घासल्याचा बहाणा करत त्यातील चौघे खाली उतरले. त्यांनी चालक आणि वाहकाला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आरोपींनी वाहकाच्या वरच्या खिशातील तिकिटाच्या जमा रकमेपैकी ८,९६० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.
लुटीनंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी रस्त्यावरील दगड उचलून एसटी बसच्या समोरील काचेवर मारला आणि काच फोडली. त्यानंतर बसची चावी घेऊन चौघेही स्कॉर्पिओमधून पसार झाले. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तपासाला वेग दिला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शिरूरसह अहिल्यानगर, आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान अजयकुमार शिनु चव्हाण (२४), पवन मधुकर घोलप (२५), आकाश सोमनाथ काळे (२१) आणि सचिन अशोक घोलप (२२) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात कारवाई करत चौघांनाही ताब्यात घेत अटक केली.
चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार क्रमांक एमएच १४ एमडब्ल्यू ५२३४ पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून या गुन्ह्याबाबत आणखी माहिती मिळते का, तसेच त्यांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास केला जाणार आहे.
गुन्हे शोध पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, निखील रावडे, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





