Shirur News : शिरूर पालिकेचे कुजलेले पाईप गेले कुठे? चोरीच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु
शिरूर नगरपरिषद हद्दीतील सी.टी.एस. क्र. १९२०/१ या खाजगी मिळकतीतून गेलेली जुनी, कुजलेली आणि बंद अवस्थेतील पाईपलाईन रहस्यमयरीत्या चोरीला (Shirur News) गेल्याने शहरात सध्या संशयाचे धुके पसरले आहे.

Shirur News : शिरूर नगरपरिषद हद्दीतील सी.टी.एस. क्र. १९२०/१ या खाजगी मिळकतीतून गेलेली जुनी, कुजलेली आणि बंद अवस्थेतील पाईपलाईन रहस्यमयरीत्या चोरीला (Shirur News) गेल्याने शहरात सध्या संशयाचे धुके पसरले आहे.
एका वर्षापूर्वी मूळ जागामालकाने ही पाईपलाईन हटवण्यासाठी नगरपालिकेकडे लेखी पाठपुरावा केला होता. दोन ते तीन स्मरणपत्रे दिल्यानंतरही पालिकेने कोणतीही हालचाल केली नाही, उलट संबंधित जागेवर बांधकामाची परवानगी दिली.
बांधकाम सुरू झाल्यावर महेंद्र फुलफगर यांनी कामात अडथळा ठरणारे ते जुने पाईप काढून शेजारील नगरपालिकेच्याच जागेत सुरक्षित ठेवले आणि अधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवरून त्याची माहितीही दिली. मात्र पालिकेने (Shirur News) वेळीच ताबा न घेतल्याने अखेर हे पाईप तेथून गायब झाले.
पाईप चोरीला गेल्यानंतर नगरपरिषदेने शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी फुलफगर यांना चौकशीसाठी बोलावले. फुलफगर यांनी पत्रव्यवहार, व्हॉट्सॲप मेसेज आणि अधिकृत परवानग्यांचे सर्व पुरावे पोलिसांना सादर केले.
प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रकार घडला असताना काही व्यक्ती व संघटना जाणीवपूर्वक आपली नाहक बदनामी करत असल्याचा आरोप फुलफगर यांनी केला असून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर फौजदारी कारवाई सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या बाजूला, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विशाल जोगदंड यांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी लावून धरली आहे. आपण कोणाचेही वैयक्तिक नाव न घेता प्रशासकीय माहितीच्या आधारे कारवाईची मागणी केली असताना व्यावसायिकाकडून आपल्याला बदनामीची नोटीस बजावण्यात आल्याचा दावा जोगदंड यांनी केला.
शहरात नव्या पाईपलाईनचे साहित्य सुरक्षित असताना केवळ कुजलेले आणि बंद पाईप (Shirur News) चोरण्यामागे नेमका काय हेतू होता, हा प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामागील गूढ उकलावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.






