ST Bus Gold Theft – रांजणगाव ते वाघोली दरम्यान एसटी बसने प्रवास करत असताना 65 वर्षीय महिलेच्या बॅगेतील तब्बल 16.2 तोळे सोन्याचे दागिने, 4.5 तोळे चांदीचे दागिने व 80 हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. 2) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ढोकसांगवी येथील कांता कदम या देवदर्शनासाठी जात असल्याने त्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेत ठेवली होती. त्या रांजणगाव ते शिवाजीनगर या एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बसमधील काही महिलांनी त्यांची बॅग वरच्या रॅकमध्ये ठेवण्यास मदत केली. दरम्यान, केसनंद फाटा येथे काही महिला प्रवासी उतरल्या. त्याच सुमारास कदम यांनी बॅगेतून पाण्याची बाटली काढण्यासाठी पाहिले असता दागिने व रोख रक्कम ठेवलेली पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रवासादरम्यानच अज्ञात चोरट्यांनी हातचलाखी करून पिशवी लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एसटी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांता कदम यांनी याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. बसस्थानके व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.