Pune District: वाघोली पोलीस ठाणे वादाच्या भोवर्यात

वाघोली : पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या वाघोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचे नागरिकांशी वर्तन सुधारत नसल्याने वाघोली पोलीस ठाणे वादाच्या भोवर्यात अडकले आहे. वादग्रस्त कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तक्रार देण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार (दि. 2) उघड झाला आहे. या प्रकरणातील ठाणे अंमलदार याने अपघात ग्रस्त नागरिकाची तक्रार न घेता त्याला खडे बोल सुनावले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कर्मचार्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. वाघोली पोलीस ठाण्यात नागरिकांना मदत होईल या अपेक्षेने येणार्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने पोलीस प्रशासनावर नागरिकांची नाराजी वाढू लागली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याप्रकरणी लक्ष दिल्यानंतर संबंधित नागरिकांची दुसर्या दिवशी तक्रार घेण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दहशतीखाली ठेवून दमबाजी करणार्या ठाणे अंमलदारांची नेमणूक चालू असलेल्या अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्यासाठी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या तरी नव्याने नेमणूक झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नागरिकांना पोलिसांची मदत व्हावी यासाठी वादग्रस्त कर्मचार्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारावा लागेल हे चिन्ह निर्माण झाले आहे.
आयुक्तांकडून दखल घेतली जाते
पुणे पोलीस आयुक्तांकडे नागरिकांच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने योग्य तो न्याय व दखल घेतल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे. वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यातील काही वादग्रस्त कर्मचार्यांच्या बाबतीत आयुक्तांनी यापूर्वी देखील खडे बोल सुनावले होते. अधिकार्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत; मात्र वादग्रस्त पोलिसांच्या बदल्या होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
जमीन, जागांचे ताबा घेणारे स्पेशालिस्ट
वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या परिसरात असणार्या जागा जमिनी व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडित व्यवसाय यांच्या बाबतीत ताबा घेऊन देणे, थांबवणे या प्रकरणात वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात काही स्पेशलिस्ट कर्मचारी आहेत. या वादग्रस्त स्पेशलिस्ट कर्मचार्यांना पोलीस आयुक्तालय मुख्यालयाचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे.





