SSC HSC Exam 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यंदा सरसकट सर्वच परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार नाही. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या परीक्षा केंद्रावरीलच कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून कॉपीमुक्त अभियानासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे. मागील वर्षी सरसकटच सर्वच परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली होती. यावरून शिक्षक संघटनांनी वांदग उपस्थित केला होता. आता त्याची दखल घेण्यात आली आहे.दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ व अनेक राज्य व विभागीय शिक्षक, मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी यांची दरवर्षीप्रमाणे सहविचार सभा राज्य मंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासह परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. अदलाबदली केल्यास इयत्ता पाचवी ते नववी, अकरावीचे कामकाज करणे कठीण होईल. प्रत्येक पेपरच्या वेळी अन्य परीक्षा केंद्रावर जाणे-येणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे होईल. परीक्षा केंद्र यावर होणारा खर्च व इतर बाबी विचारात घेऊन सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत, अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याबाबतचा आग्रह संघटनांकडून बैठकीत धरण्यात आला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.बहुतांश परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचारी न बदलणेबाबत संघटनांनी केलेली मागणी, कर्मचारी अदलाबदल केल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजात येणारा विस्कळीतपणा, होणारा खर्च या सर्व बाबी लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्याच परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार असून, याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी आदेशही काढले आहेत.