SSC Board Exam 2026: दहावीच्या परीक्षेचे काऊंटडाऊन सुरू; येत्या मंगळवारपासून मिळणार प्रवेशपत्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी येत्या मंगळवार (दि. २०) पासून सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्व माध्यमिक शाळांना परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. माध्यमिक शाळांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मठिकाण अशा दुरुस्त्या असल्यास या दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने करावयाच्या आहेत. विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्याबर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

