SL vs PAK : पैसा की प्रतिष्ठा? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेसमोर मोठा पेच! नेमकं कशाला देणार प्राधान्य?
SL vs PAK : या सामन्यात खेळाच्या मैदानाबाहेर एका वेगळ्याच आर्थिक गणिताची चर्चा रंगली आहे.

SL vs PAK Financial Stakes : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज (२८ फेब्रुवारी) श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात पल्लेकेले येथे सामना खेळला जात आहे. श्रीलंकेचा संघ यापूर्वीच सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी या सामन्याचा निकाल पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे नशीब ठरवणार आहे. मात्र, या सामन्यात खेळाच्या मैदानाबाहेर एका वेगळ्याच आर्थिक गणिताची चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ची स्थिती
सुपर-८ च्या गुणतालिकेत न्यूझीलंड ३ गुणांसह (+१.३९० नेट रनरेट) दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान सध्या १ गुणासह (-०.४६१ नेट रनरेट) तिसऱ्या स्थानावर असून त्यांच्याकडे एक शेवटची संधी आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेवर किमान ६४ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा १३.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल.
आर्थिक गणिते आणि श्रीलंकेचा फायदा –
हा सामना श्रीलंकेसाठी केवळ एक औपचारिक सामना असला, तरी तो आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, तर विश्वचषकाचे दोन मोठे बाद फेरीचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
यामध्ये पहिला सेमीफायनल (४ मार्च) आणि अंतिम सामना (८ मार्च) कोलंबो येथे होतील. जर पाकिस्तान बाहेर पडला, तर हे दोन्ही सामने भारतात हलवले जातील. भारत-पाकिस्तान फायनल झाल्यास श्रीलंकेला पर्यटन, हॉटेल बुकिंग आणि प्रसारणातून प्रचंड महसूल मिळण्याची शक्यता आहे.
खेळ भावना की व्यापार?
जर श्रीलंकेने आर्थिक फायद्यासाठी ‘सॉफ्ट’ खेळ केला, अशी धारणा निर्माण झाली, तर त्यांच्या प्रतिमेला जागतिक स्तरावर मोठा धक्का बसू शकतो. कोणत्याही मोठ्या स्पर्धेत निष्पक्षता महत्त्वाची असते. श्रीलंका आपल्या देशाच्या सन्मानासाठी खेळून पाकिस्तानला बाहेर करणार की फायद्यासाठी सामन्यात ढिलाई दाखवणार, याकडे आता संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष लागले आहे.






