Sri Lanka News : अमेरिकेची लढाऊ विमाने उतरण्यास श्रीलंकेने परवानगी नाकारली; स्वतः अध्यक्षांनी दिली माहिती
भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या नौदल ताफ्याच्या संचलन सरावानंतर ते जहाज मायदेशी परतत होते.

Sri Lanka News : अमेरिकेची लढाऊ विमाने श्रीलंकेमध्ये उतरण्यास श्रीलंकेने परवानगी नाकारली आहे. श्रीलंकेच्या दक्षिणेकडील माट्टाला आंतरराष्ट्रीयविमानतळावर ही विमाने उतरण्यास मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच परवानगी नाकारण्यात आली आहे, असे श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी आज संसदेत बोलताना सांगितले.
जिबूतीमधील अमेरिकेच्या दोन लढाऊ विमानांनी दिनांक ४ आणि ५ मार्च दरम्यान श्रीलंकेत उतरण्याची परवानगी मागितली होती. मात्र दोन्ही विमानांना ही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे दिसानायके यांनी सांगितले.
इराण युद्धाच्या मुद्द्यावर श्रीलंकेने तटस्थ भूमिका घेतली आहे. कितीही दबाव आला तरी श्रीलंकेला ही तटस्थता कायम ठेवायची आहे. ही भूमिका आम्ही सोडणार नाही. मध्यपूर्वेतल्या युद्धामुळे आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. पण आम्ही तटस्थ राहण्यासाठी शक्य असेल, ते सर्व काही करणार आहोत, असे दिसानायके म्हणाले.
दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे अमेरिकेचे विशेष दूत सर्गेई गोर आणि दिसानायके यांच्यात कालच बैठक झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिसानायके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
व्यापारी आणि व्यवसायिक संबंध जपण्यासाठी, तसेच मुक्त, खुल्या आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी सागरी वाहतूक मार्ग सुरक्षित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांबाबत गोर आणि दिसानायके यांनी सविस्तर चर्चा केली.
दिनांक ४ मार्च रोजी अमेरिकेने इराणच्या दक्षिणेकडील गॉल या किनारपट्टीच्या शहराजवळ इराणी विनाशिका इरिस डेन’वर टॉर्पेडोचा हल्ला केला होता. त्यात ८४ खलाशी ठार झाले तर ३२ जणांना वाचवण्यात आले होते.
भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या नौदल ताफ्याच्या संचलन सरावानंतर ते जहाज मायदेशी परतत होते. दोन दिवसांनंतर इसिर बुशहर या आणखी एका इराणी जहाजाला श्रीलंकेने नांगर टाकण्याची अनुमती दिली.






