IPL Slapgate Controversy : कानाखाली मारली अन् जाहिरातीतून पैसेही कमावले! हरभजन सिंगवर श्रीसंत का भडकला? १८ वर्षांनंतर पुन्हा जुंपली
IPL Slapgate Controversy : माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने हरभजन सिंगवर (भज्जी) गंभीर आरोप करत, त्याने या 'थप्पड कांड' प्रकरणाचा वापर पैसे कमवण्यासाठी केल्याचा दावा केला आहे

Sreesanth Harbhajan Singh IPL Slapgate Controversy : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त ठरलेले ‘स्लॅपगेट’ (Slapgate) प्रकरण १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने हरभजन सिंगवर (भज्जी) गंभीर आरोप करत, त्याने या थप्पड प्रकरणाचा वापर पैसे कमवण्यासाठी केल्याचा दावा केला आहे. श्रीसंतच्या या विधानामुळे दोघांमधील जुनी कडू आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
आयपीएल २००८ मधील त्या प्रसिद्ध ‘थप्पड कांड’ प्रकरणावरून श्रीसंतने आता मौन सोडले आहे. एका मल्याळम वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतने हरभजन सिंगवर टीकेची झोड उठवली. श्रीसंतच्या मते, हरभजनने अलीकडेच या ‘थप्पड कांड’ प्रकरणावर आधारित एक जाहिरात (Add) केली, ज्यातून त्याने ८० लाख ते १ कोटी रुपये कमावले. इतकेच नाही, तर ही जाहिरात प्रमोट करण्यासाठी भज्जीने श्रीसंतला फोनही केला होता, ज्यामुळे श्रीसंत कमालीचा संतापला आहे.
“माफ करेन पण विसरणार नाही” –
श्रीसंत म्हणाला की, “मी त्याला माफ केले आहे, पण त्याने जे केले ते मी कधीही विसरणार नाही. जर तुम्ही विसरलात, तर समोरची व्यक्ती पुन्हा तेच कृत्य करेल. भज्जीने जाहिरात केल्यानंतर मला फोन करून सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करायला सांगितली. हे अत्यंत क्लेशदायक होते. माझ्या आई-वडिलांनी मला माफ करायला शिकवले आहे, विसरायला नाही.” श्रीसंतने आता हरभजनला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले असून त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आहेत.
काय होते २००८ चे ‘थप्पड कांड’ प्रकरण?
आयपीएलच्या पहिल्या हंगामात (२००८) पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर हरभजनने श्रीसंतला कानाखाली लगावली होती. या घटनेनंतर श्रीसंत मैदानात रडताना दिसला होता, ज्याचे फोटो आजही व्हायरल होतात. या कृत्यामुळे हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. श्रीसंतने आता हरभजनच्या वागण्याला ‘नाटक’ संबोधले असून, आर. अश्विनसोबतच्या मुलाखतीत भज्जीने केलेल्या विधानांवरही नाराजी व्यक्त केली आहे.





