Fake Liquor Racket: नकली दारूच्या धंद्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण? आळेफाटा-माळशेज परिसरात मोठी साखळी…’हप्ता’ वसुलीचे आरोप
Fake Liquor Racket: 'दैनिक प्रभात'च्या वृत्तानंतर जुन्नर तालुक्यातील अवैध दारू विक्रीच्या तक्रारी ऐरणीवर; स्थानिक नागरिक आणि परवानाधारक विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप.

– संजय थोरवे
Fake Liquor Racket – जुन्नर तालुक्यात देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, परमिट रूम आणि बिअर बारमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याबाबत ‘दैनिक प्रभात’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर माळशेज, ओतूर, ओझर आणि आळेफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात नकली दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या अवैध व्यवसायामागे नेमके कोण आहे? नकली दारू तयार करण्यापासून ती गावागावात पोहोचविण्यापर्यंतची साखळी कोण चालविते?
या व्यवसायाचा ‘मास्टरमाईंड’ कोण, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कारवाई करण्याबरोबरच परवानाधारक दारू विक्रीच्या दुकानांमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे.
मात्र, अनेक प्रकरणांमध्ये अवैध दारूविरोधातील कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जात असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रत्यक्ष भूमिका काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आणि खेड्यापाड्यांत अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी असून, त्याची अधिकृत तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
अवैध दारू विक्री करणार्यांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनातील संबंधितांना ‘हप्ता’ दिला जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक आहे. या दाव्यांमध्ये तथ्य आहे का, असल्यास त्यामध्ये नेमके कोण सहभागी आहेत, याचा वरिष्ठ अधिकार्यांनी तपास करावा, अशी मागणी होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात काही ठिकाणी नकली दारू तयार करणार्यांविरोधात कारवाई करून मुद्देमाल जप्त केला होता. मात्र, या प्रकरणांमध्ये पुढे काय कारवाई झाली? नकली दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कोठून येत होता? त्याचा पुरवठा करणारे कोण? तयार झालेली दारू कुठे आणि कोणामार्फत विकली जात होती?
या संपूर्ण साखळीचा छडा लागला का? याची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. माळशेज, ओतूर, ओझर आणि आळेफाटा परिसरात नकली देशी-विदेशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामागे खात्यातीलच एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा असल्याचा आरोपही एका परवानाधारक दारू विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.
मात्र, या आरोपाची स्वतंत्र पुष्टी झालेली नसल्याने त्याची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे. जर अवैध व्यवसायाला संरक्षण देणारेच संबंधित यंत्रणेत असतील, असा आरोप खरा ठरला, तर ‘कुंपणच शेत खात असेल तर त्या कुंपणाचा उपयोग काय?’ असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
नकली दारू विक्री करणार्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याबरोबरच या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, दारू तयार करणारे, कच्चा माल पुरविणारे, वाहतूक करणारे आणि गावागावात विक्रीचे जाळे उभे करणारे यांचा शोध घेणे आवश्यक आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून अवैध व्यवसायाची मुळे उखडली जाणार नाहीत.






