Leopard Attack: पाठीवरचा फवारणी पंप ठरला देवदूत! बोरी बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यातून दाम्पत्य कसे वाचले?
Leopard Attack: शेतात कामासाठी जाणाऱ्या दत्तात्रय शिंदे व विद्या शिंदे यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; सुदैवाने मोठी दुखापत टळली.

Leopard Attack – शेतात कामासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या दाम्पत्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातल्याने बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील मेंटागळे परिसरात बुधवारी सकाळी थरारक घटना घडली. बिबट्याच्या अचानक हल्ल्यामुळे दत्तात्रय बाळाजी शिंदे आणि विद्या शिंदे हे मोटारसायकलवरून खाली पडले. मात्र, विद्या शिंदे यांच्या पाठीवर असलेला फवारणी पंप बिबट्याच्या हल्ल्यात अडथळा ठरल्याने मोठा अनर्थ टळला.
दाम्पत्य मोटारसायकलवरून शेताकडे जात असताना रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्याने दोघेही घाबरून मोटारसायकलवरून खाली पडले. यावेळी विद्या शिंदे यांच्या पाठीवर असलेला फवारणी पंप बिबट्याला अडथळा ठरला. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून त्यांचा बचाव झाला. या घटनेत विद्या शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच वनपाल गणेश बागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून तातडीने पिंजरा लावण्यात आला. यावेळी बचाव पथकाचे संतोष कुतळ, रोहित बोडके आणि जयेश भोर उपस्थित होते. बोरी बुद्रुक परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकर्यांना शेतात ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनविभागाने परिसराची सखोल पाहणी करून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





