Alephata to Ale Road: आळेफाटा-आळे रस्ता की खड्ड्यांची मालिका? २ किमीच्या प्रवासात वाहनचालकांचे हाल
Alephata to Ale Road: अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि पसरलेली खडी; दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण वाढले.

Alephata to Ale Road – पुणे-नाशिक आणि कल्याण-अहिल्यानगर या महत्त्वाच्या मार्गांशी जोडलेल्या आळेफाटा परिसरातील आळेफाटा ते आळे हा अवघा दोन किलोमीटरचा रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याची दुरवस्था दुचाकीस्वारांसाठी विशेष धोकादायक ठरत आहे. खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला असून, आळे स्टॅण्ड परिसरातील मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक घसरून पडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मार्गावर दिवसभर अवजड वाहने, ट्रक, चारचाकी तसेच दुचाकींची मोठी वर्दळ असते.
खड्डे चुकविताना वाहनचालकांना अचानक दिशा बदलावी लागत असल्याने समोरून येणार्या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता आणखी वाढते. रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रश्न मिटविण्याऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करून संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतरच प्रशासन जागे होणार?
आळेफाटा ते आळे या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याची अशी दुरवस्था असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार की त्याआधीच रस्त्याची दुरुस्ती होणार? असा संतप्त सवाल आळेफाटा परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





