SPPU Recruitment : पुणे विद्यापीठातील १११ शिक्षक पदांसाठी भरतीचा मार्ग मोकळा, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे मुदत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांत शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील १११ शिक्षकी पदांच्या भरती प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करता येणार असून, ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही, असे नवीन उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या रिक्त जागांसाठी १३ सप्टेंबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. काही कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. राज्य शासनाने विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी नव्याने नियमावली प्रसिद्ध केली. ६ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या नियमावलीनुसार आता विद्यापीठाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ४७, सहयोगी प्राध्यापक पदाच्या ३२ व प्राध्यापक पदाच्या प्रत्येकी ३२ अशा एकूण १११ जागांसाठी हे अर्ज मागवले आहेत.
उमेदवारांना ८ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज येणार आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रत १२ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या शिक्षक कक्षाकडे जमा करावी लागणार आहे. विद्यापीठाने १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसंदर्भातील शुद्धिपत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भोकरे यांनी स्पष्ट केले आहे.

