SPPU News: विद्यार्थ्यांच्या ‘थाळी मार्च’ आंदोलनाचा मोठा दणका! पुणे विद्यापीठाने मेसची दरवाढ केली रद्द
SPPU News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मेस दरवाढीविरोधात २१ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या एसएफआयच्या आंदोलनाला यश; प्रशासनाकडून परिपत्रक रद्द.

SPPU News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहामध्ये प्रशासनाने केलेल्या दरवाढीच्या विरोधात आज एसएफआयच्या वतीने थाळी मार्च आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दणक्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मेसची दरवाढ पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ सप्टेंबरपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मेस दरवाढीच्या विरोधात एसएफआयच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत मेस दरवाढीच्या प्रश्नासंदर्भात विद्यापीठाच्या मा. कुलगुरूंसोबत तीन वेळेस बैठक झाली. तिसऱ्या बैठकीत, २६ तारखेच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंकडून देण्यात आले. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादांमुळे बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते आणि २६ सप्टेंबर रोजी थाळी मार्च नियोजित करण्यात आला होता.
नियोजित वेळापत्रकानुसार, २६ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य गेटपासून मुख्य इमारतीपर्यंत थाळी मार्च आंदोलन काढण्यात आले. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. एसएफआयच्या या थाळी मार्च आंदोलनाच्या दणक्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक क्रमांक २०८/२०२६ रद्द केले आहे. हा विद्यार्थी आंदोलनाचा एक जबरदस्त विजय ठरला आहे.
या आंदोलनात 200 विद्यार्थी सहभागी होते तसेच, या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआयचे राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, राज्य सह-सचिव निशा साबळे, राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्षा संस्कृती गोडे, तसेच अभिषेक शिंदे, निकिता मेचकर, आदित्य कासारे, गणेश जानकर, आकाश लोणकर, सोमनाथ वामन, पवन जाधव, कणद विश्वास, विघ्नेश, सृष्टी घुमरे, ऋषिकेश शिंदे, सृष्टी लोखंडे, एकता सक्राते, मोसिन बनकर, मयूर हिले, सोनाली जाधव, काजल कासारे, उमंग बुरांडे, कृष्णा रक्ताटे, वैष्णवी रक्ताटे, हनुमान शिंदे, सुशांत जाधव, आदित्यन, तनिष्का भंडारी आणि हेतवी आदींनी केले.






