SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलसचिव पदाची नियुक्ती गेल्या दीड वर्षांपासून रखडल्याने आता शैक्षणिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. २०१४ मध्ये झालेल्या मुलाखतींनंतरही अद्याप पूर्णवेळ नियुक्ती न झाल्याने जुनी प्रक्रिया रद्द करावी, तसेच वादग्रस्त प्रतिमेच्या उमेदवाराची वर्णी लावण्याचा प्रयत्न झाल्यास विद्यापीठाची प्रतिमा मलिन होईल, असा इशारा देत अधिसभा सदस्य प्रा. हर्ष गायकवाड यांनी कुलगुरूंना निवेदनाद्वारे जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी १० व ११ जुलै २०२४ रोजी मुलाखती पार पडल्या होत्या. मात्र, अद्याप सक्षम आणि पात्र उमेदवाराची नियुक्ती केली नाही. पूर्णवेळ कुलसचिव नसल्यामुळे विद्यापीठाचे अनेक प्रशासकीय निर्णय आणि दैनंदिन कामकाज प्रभावित होत असल्याचे निवेदनात नमूद केले असून, कुलसचिव निवडीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी प्रा. गायकवाड यांनी केली आहे. कुलसचिव पदासाठी ज्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू आहे, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित उमेदवाराविरुद्ध विविध सामाजिक संघटनांनी यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. संबंधित उमेदवाराला त्याच्या संस्थेतील तक्रारींमुळे विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा लागला असून, सध्या त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी चौकशी समिती नेमली आहे. विशेष म्हणजे संबंधित संस्थेने या उमेदवाराला दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देखील मागे घेतले आहे. अशी प्रतिमा असलेल्या व्यक्तीची नियुक्ती केल्यास विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, याकडे प्रा. गायकवाड यांनी लक्ष वेधले. कुलसचिव हे विद्यापीठाचे महत्त्वाचे प्रशासकीय पद आहे. या पदावर बसणारी व्यक्ती निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न असावी. प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली येऊन वादग्रस्त उमेदवाराची नियुक्ती केली, तर विविध सामाजिक संघटनांना एकत्र करून जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही प्रा. गायकवाड यांनी दिला आहे.