Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार
Pune : पुणे विद्यापीठात ‘यूथ की आवाज’ कार्यक्रमात हजारो युवकांनी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायले. मोबाइल फ्लॅशलाईट्सने परिसर उजळला.

Pune : देशभक्तीपर गीतांचे सूर, हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाईट्सचा लखलखाट आणि एकसुरात घुमणारा ‘वंदे मातरम्’चा जयघोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर शुक्रवारी देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘यूथ की आवाज’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम् के सन्मान में, देश का युवा मैदान में’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘जिंदगी मौत ना बन जाए’, ‘सुनो गौर से दुनियावालों’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘जय हो’, ‘जय जय जय महाराष्ट्र माझा’, ‘शूर आम्ही सरदार’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या गीतांनी उपस्थितांमध्ये देशभक्ती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची भावना जागवली.
यावेळी ‘वंदे मातरम्’च्या इतिहासालाही उजाळा देण्यात आला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून समोर आलेल्या या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यलढ्यातील त्याच्या योगदानाची माहिती देण्यात आली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत गायले होते. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी मैदानावरील दिवे मंद करण्यात आले. त्याचवेळी हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाईट्स एकाच वेळी सुरू झाल्याने विद्यापीठाच्या मैदानावर नक्षत्रांचे आभाळ अवतरल्यासारखे दृश्य निर्माण झाले. हातात मोबाइलची प्रकाशज्योत आणि ओठांवर ‘वंदे मातरम्’ घेत युवकांनी सामूहिक गायन केले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता झाली.
‘राष्ट्रभक्त युवक संपूर्ण वंदे मातरम् म्हणणार’
केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील युवकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘आज देशभक्त युवा संपूर्ण वंदे मातरम् म्हणणार आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण वंदे मातरम् म्हणतो. मात्र, काँग्रेसमधील काही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्याला विरोध केला. त्यांनी देशाची, क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर व्यक्तींची माफी मागितली पाहिजे. संविधानाचीही माफी मागितली पाहिजे. राष्ट्रभक्त युवक संपूर्ण वंदे मातरम् म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेसला हे दाखवून देऊ. आपण देशाची ताकद आणि शक्ती आहात. आम्ही आपल्या सोबत आहोत.’’





