SPPU News : पुणे विद्यापीठात राडा! कमवा-शिका मानधन वाढीवरून व्यवस्थापन परिषदेत ‘क्रे़डिट वॉर’
SPPU News : कुलगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कमवा-शिका योजनेच्या श्रेयवादावरून दोन सदस्यांत वाद; निर्णय परस्पर जाहीर केल्याचा एका गटाचा आरोप.

SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत शनिवारी विद्यार्थी हिताच्या निर्णयापेक्षा सदस्यांमधील अंतर्गत गटबाजी आणि श्रेयवादच अधिक चर्चेत राहिला. कमवा आणि शिका योजनेच्या मानधन वाढीचा निर्णय अधिकृतरीत्या होण्यापूर्वीच तो परस्पर जाहीर केल्याच्या मुद्द्यावरून दोन सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात प्रति तास १० रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, हा निर्णय बैठकीत होण्यापूर्वीच एका सदस्याने तो सार्वजनिक केल्याचा आक्षेप दुसऱ्या सदस्याने घेतला. प्रोटोकॉल न पाळता परस्पर निर्णय कसा जाहीर केला जातो? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या टीकेला उत्तर देताना मानधन वाढीसाठी नेमलेल्या समितीच्या प्रमुखांनी आपली बाजू मांडली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना केवळ आश्वासित करण्यात आले होते. अंतिम निर्णय परिषदेतच होईल, असे विद्यार्थी संघटनांना स्पष्ट केले होते. त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, या विषयावरुन व्यवस्थापन परिषदेत रंगलेली ही गटबाजी शैक्षणिक वर्तुळात चर्चेची ठरत आहे.
लाखाचीच सुवर्णमुद्रा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १० ग्रॅमच्या सुवर्णमुद्रेच्या नियमात आता मोठा बदल करण्यात आला आहे. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे विद्यापीठाने आता १० ग्रॅमऐवजी एक लाख रुपयांच्या मर्यादेत बसेल इतकीच सुवर्णमुद्रा देण्याचा निर्णय घेतला आहे.





