Pune | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा साडेअकरा हजार विद्यार्थ्यांना लाभ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली असून तिचा राज्यातील सुमारे ११ हजार ५३१ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या बँक खात्यात भोजन, निवास, निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला साठ हजार रुपये जमा होतात.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्यासाठी आदिवासी विकास विभाग पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम व समाज कल्याण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवते. त्याच धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबवली जाते.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जाते.योजनेसाठी एकुण ३३ हजार ९५५ अर्ज दाखल झाले होते. त्यातून मुंबई – ६९८, नाशिक -२४३३, पुणे – ८०७, अमरावती – १५३, नागपूर – ६४०७, छत्रपती संभाजीनगर – ३७९, लातूर – ६५४ असे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.





